मुंबई: महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आता कॉंग्रेसने नवीन जबाबदारी दिली आहे. त्यांची मध्य प्रदेश अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यांची कॉंग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी त्यांच्याकडे आता मध्य प्रदेश अंमलबजावणी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून सत्तेचा प्रस्ताव होता असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाला नाकारले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने यावर आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे.