पृथ्वीराज चव्हाण, वासनिक, देवरांनी माफी मागावी: कॉंग्रेस नेत्याकडून इशारा

0

मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षपदावरून दोन गट पडल्याचे दिसून येते. काही नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कॉंग्रेसमधील काही नेत्यांनी पत्र पाठवून अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. गांधी घराण्याव्यतिरिक्त व्यक्ती अध्यक्ष पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र यावरून कॉंग्रेसमध्ये मोठी गटबाजी होत असल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीतील मंत्री कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांना जाहीररित्या फटकारले आहे. “काँग्रेस नेते मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद आहे” त्यांनी माफी मागावी अन्यथा कॉंग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात फिरू देणार नाही अशी टीका महाराष्ट्रातील दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केली. यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे. यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झालं आहे. त्यातील एक म्हणजे गांधी घराण्याचे समर्थन करणारा, तर दुसरा गट हा पक्षाला बळकट करण्याची मागणी करणारा आहे. या पार्श्वभूमीवर सुनील केदार यांनी ट्विट करत राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणी कमिटीची आज बैठक आयोजित केली आहे. आज सकाळी 11 वाजता ही बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची दाट शक्यता आहे.त्यांचा अंतरिम अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे.