‘पॅडमॅन’मुळे स्त्रियांच्या भावनांना वाट!

0

जळगाव । महिलांमधील मासिकपाळी ही नैसर्गिक बाब आहे. आजच्या आधुनिक युगात देखील मासिक पाळीबद्दलल अनेक समज-गैरसमज समाजामध्ये असल्याने स्त्रियांना आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलले जात नसल्याने स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. मात्र पॅडमॅन चित्रपट आल्यापासून यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून विशेषतः किशोरवयीन मुली आपल्या मनातील भावना, समस्या कुटुंबीयांकडे खुल्यापणाने व्यक्त करीत असल्याचे सुर विद्यार्थीनींनमधून उमटले. जि.प.शिक्षण विभागाने विशेष उपक्रमाद्वारे मुलींना कांताई सभागृहात पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर माध्यमांसमोर विद्यार्थींनीनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त केले.

सक्षम पिढी घडेल
सुशिक्षीत, संस्कारक्षम व सक्षम पिढी घडविण्यामागे स्त्रीयांची भुमिका महत्वाची आहे. त्यासोबतच आज महिला सक्षमीकरणाची मोठी गरज आहे. परंतू स्त्रियांचे आरोग्य सृदृढ असले तरच चांगली पिढी घडू शकते. महिलांना मासिकपाळी दरम्यान योग्य काळजी न घेतल्यामुळे अनेक आजार जडतात, प्रसंगी जीवही गमवावे लागते. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. दरम्यान महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी पॅडमॅन चित्रपट वरदान ठरले असल्याचे मत शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
विविध शाळांमधील 8 वी ते 10 वीच्या मुलींना मासिकपाळी दरम्यान महिलांनी स्वच्छतेविषयी घ्यावयाची काळजी व पाळी संदर्भात समाजात असलेले समज-गैरसमज या विषयावर आधारीत असलेला पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आले. जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डी.एम.देवांग, विकास पाटील, प्रतिभा सुर्वे, बळीराम धाडी, किशोर वायकाळे आदी उपस्थित होते.

हा चित्रपट महिलांमध्ये आणि विशेषताः किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करण्यासाठी महत्वाचा ठरला आहे. ग्रामीण भागात जनजागृतीची अधिक आवश्यकता आहे. चित्रपटातून एखाद्या नवरा जर आपल्या बायकोच्या आरोग्याची काळजी घेतो तर आम्हा महिलांनी देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
– शेख मस्सरद जाखिया ,उर्दू हायस्कूल

तस पाहिलं तर मासिक पाळी हा विषय नैसर्गिक असून केवळ महिलांपूरता तो मर्यादीत आहे. परंतू याकाळात योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना महिलांना सामोरे जावे लागते. परंतू चित्रपटामुळे यात जनजागृती झाली आहे.
-वनिता ब्राह्मणकर, प.न.लुंकड हायस्कूल

चित्रपट येण्याअगोदर मासिक पाळी हा विषय केवळ महिलांपुरता वैयक्तिक होता. मात्र चित्रपटामुळे महिला, मुली आपल्या भावना खुल्यापणाने मनमोकळ्या व्यक्त करु शकता आहे. खर्‍या अर्थाने चित्रपटामुळे महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे.
-पुर्वा बडगुजर,प.न.लुंकड हायस्कूल