‘पॅन सिटी’ प्रकल्पासाठी अडीचशे कोटींची कामे हाती

0

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अंमलबजावणी

पिंपरी-चिंचवड : शहरात ’स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत महापालिकेमार्फत पॅन सिटीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तब्बल 250 कोटीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी ‘सिस्टीम इंटीग्रेटर’ची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या एक टक्के म्हणजेच अडीच कोटी रूपये खर्च होणार आहे. शहरात राबविण्यात येणारा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प हा विभागनिहाय विकास आणि ’पॅन सिटी सोल्युशन्स’ या दोन घटकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ’पॅन सिटी’तून इंटरनेट कनेक्टिविटी, वायफाय सुविधा, वाहतूक, पाणी पुरवठा, घनकचरा नियोजन आणि ’ऑपरेटिंग सिस्टिम’ यासारख्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. त्याअंतर्गत 1 हजार 149 कोटी रूपये खर्चाचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यापैकी 593 कोटी 67 लाख रुपये विभागनिहाय विकासाअंतर्गत तर 555 कोटी 53 लाख रूपये ’पॅन सिटी सोल्युशन्स’ अंतर्गत प्रकल्पांवर खर्च करण्यात येणार आहेत.

वाय-फाय, सीसीटीव्ही…
पॅन सिटीतून फायबर ऑप्टिक केबलचे जाळे, 300 वाय – फाय स्पॉट करणे, नागरिकांसाठी स्मार्ट कि ऑक्स, सीसीटीव्ही, इंटरनेटद्वारे वाहतूक नियोजन, स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, शहरात स्मार्ट पार्किंगची सोय, स्मार्ट पाणी पुरवठा सुविधा, स्मार्ट जलनि:सारण सुविधा, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट दिवाबत्ती व्यवस्था, पर्यावरणपूरक सुविधा आणि नियंत्रण, कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारणे, जीआयएस ट्रकिंग सिस्टिम, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि स्मार्ट सिटी मोबाइल ऍप या सुविधा संपूर्ण शहराला मिळणार आहेत.

निविदेसाठी अडीच कोटी खर्च
महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारला सादर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रस्तावाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत करण्यात येणार आहे. या अंमलबजावणीच्या दृष्टीने ’पॅन सिटी’चे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या विषयाबाबतचा प्रस्ताव अर्नस्ट ऍण्ड यंग या सल्लागार संस्थेमार्फत तयार करण्यात आला आहे. प्रकल्प अंमलबजावणीसाठी 14 महिने आणि दुरूस्ती व देखभालीसाठी पाच वर्षे कालावधीकरिता 250 कोटी 60 लाख रूपये अधिक जीएसटी असा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, निविदेकरिता एकूण प्रकल्प खर्चाच्या एक टक्के म्हणजेच 2 कोटी 50 लाख 60 हजार रूपये तसेच प्रस्ताव कागदपत्र शुल्कासाठी 50 हजार रूपये असा खर्च अपेक्षित आहे.