पॅशन म्हणून सिनेमॅटोग्राफीकडे वळा – अर्चना

0

मुंबईतच लहानाची मोठी झालेली सिनेमॅटोग्राफर अर्चना बोर्‍हाडे मुळात एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. इंजीनीअर होऊनही अर्चनाला सिनेमाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. मुंबई युनिव्हर्सिटीमधून इंन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनीअर बनल्यानंतरही अर्चनाने सिनेमातील प्री प्रॉडक्शनपासून पोस्ट प्रॉडक्शनपर्यंत सर्व कामं शिकून घेतली. सुरुवातीपासूनच छायाचित्रणाची आवड असल्याने शूटिंगचा कॅमेरा हाताळायला तिला आवडत होतं. पुढे हीच आवड पॅशनमध्ये बदलली आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आज तिने सिनेमॅटोग्राफर म्हणून नाव कमावलं आहे.

दिग्दर्शक सुजय डहाकेच्या ‘फुंतरू’ या चित्रपटाद्वारे अर्चनाने आपल्या करियरची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला, तरी अर्चनाच्या कामाचं सर्वांनीच कौतुक केलं. अर्चनाने स्वतंत्रपणे जाहिराती, कॉर्पोरेट फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, म्युझिक व्हिडियोजचंही छायालेखन केलं होतं. अनुभवाच्या या शिदोरीच्या बळावरच अर्चनाने ‘फंतरू’सारख्या मराठीतील पहिल्या सायन्स फिक्शन चित्रपटाचं यशस्वी छायालेखन केलं. एखाद्या महिला सिनेमॅटोग्राफरचा आदर्श महिला सिनेमॅटोग्राफरच असायला हवी असं अर्चना मानत नाही.
– संजय घावरे