मुंबई – रेल्वे प्रमाणे मुंबईकरांची जीवनवहिनी समजल्या जाणाऱ्या बेस्टची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचावी या उद्देशाने भायखला येथील राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षाच्या वरच्या मजल्यावरील मोकळ्या जागेत बेस्टचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेकडे ठेवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी मंगळवारी बेस्ट सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सध्या आणिक नगर येथे बेस्टचे संग्रहालय आहे. मात्र तेथे सर्व नागरिकांना भेट देणे शक्य होत नाही. राणीच्या बागेत पेंग्विन आल्यापासून पर्यटकांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. इत्यामुळे पेंग्विन कक्षाच्या वरील मोकळ्या हॉलमध्ये बेस्टचे संग्रहालय उभारण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस आहे. राणीच्या बागेत पेंग्विन असलेल्या इमारतीत बेस्ट संग्रहालय उभारल्यास त्याला जास्तीत जास्त नागरिक भेट देतील असेही ते म्हणाले.
बेस्टने काही मार्गांवर नव्याने बससेवा सुरू केली आहे. बेस्टच्या थांब्याच्या जागेवर रिक्षा टॅक्सी चालक अतिक्रमण करून बेस्टचे प्रवासी घेऊन जातात. हे टाळण्यासाठी बेस्टचे अधिकारी त्यांना हटवण्यासाठी पुढाकार घेतात, त्या दरम्यान स्थानिक वाहतूक पोलिसांनी बेस्ट अधिकाऱ्यांना त्यावेळी मदत करावी असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केले आहे.
बेस्ट दिनानिमित्त 6 व 7 ऑगस्ट रोजी रवींद्र नाट्य मंदिर मधील पु.ल. देशपांडे कला अकादमी प्रदर्शन सभागृहात बेस्टच्या वस्तू संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन विनामुल्य असणार असून 7 ऑगस्ट रोजी बेस्ट कर्मचार्यांच्या कुटुंबियांचे संमेलन होणार आहे.त्याला अधिकाधिक नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.