पेटीएमची पेमेंट बँक होणार 23 मेपासून सुरू

0

नवी दिल्ली । अखेर पेटीएमची पेमेंट बँक 23 मे पासून सुरू होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. पेटीएमने सार्वजनिकरीत्या जाहीर केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड (पीपीबीएल)ला रिझर्व्ह बँकेकडून अंतिम परवाना मिळालेला आहे आणि ही बँक 23 मेपासून आपल्या कामकाजास सुरुवात करणार आहे तसेच पेटीएमने रेणू सत्ती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

पेटीएम आपला वॉलेटचा संपूर्ण व्यवसाय पीपीबीएलमध्ये स्थानांतरित करणार आहे. यात 21.80 कोटी मोबाइल वॉलेट वापरणार्‍या लोकांचा समावेश आहे. पेमेंट बँकेचे हे लायसन्स भारतीय निवासी विजय शेखर शर्मा यांना मिळाले आहे. विजय शेखर शर्मा पीटीएमची मालकी असणारी कंपनी ‘वन97 कम्युनिकेशंस’चे संस्थापक आहेत. 23 मेनंतर पेटीएम वॉलेटचा व्यवसाय ‘पीपीबीएल’मध्ये समाविष्ट होईल, असे यात म्हटले आहे. जर एखादा ग्राहक असे करण्यास इच्छुक नसेल तर त्याला पेटीएमला सूचित करावे लागणार आहे. माहिती मिळाल्यानंतर ‘पेटीएम’त्याच्या वॉलेटमधील उर्वरित रक्कम संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहे. अशा पद्धतीची माहितीही 23 मेच्या पूर्वी द्यावी लागणार आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात वॉलेटमध्ये जर कुठलेही कामकाज झालेले नसेल तर अशा परिस्थितीत फक्त ग्राहकांच्या विशेष परवानगीनंतरच ‘पीपीबीएल’मध्ये हस्तांतरण होईल.