देहूरोड: जमिनीखाली दहा फूट लांबीचे भुयार खोदून भूमिगत पेट्रोलवाहिनीतून सुमारे साडेसहा लाखांचे दहा हजार लिटर पेट्रोल चोरी केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रविवारी सायंकाळी चिंचवड येथील रामनगर भागात सापळा रचून पोलिसांनी चौघांना अटक केली. बाळू अण्णा चौघुले (वय 36, रा. रामनगर, चिंचवड), रामकुमार उर्फ रामप्रसाद निरहू यादव (वय 36, रा. लालटोपी नगर, एमआयडीसी रोड, पिंपरी), संतोष फौजदार गुप्ता (वय 29, रा. रामनगर, चिंचवड) आणि इम्रान मुक्तारहुसेन अन्सारी (वय 23, रा. कुंभारीगाव, सोलापूर) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
…गुन्हा दाखल व तपासाला गती
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळवडे येथे सर्व्हे क्रमांक 71 वर पत्राशेड बांधून त्याच्या मधोमध सहा फूट खोल आणि दहा फूट लांबीचे भुयार खोदून हिंदुस्थान पेट्रोलियमच्या भूमिगत पेट्रोलवाहिनीला भोक पाडण्यात आले होते. त्यातून लोखंडी पाईपद्वारे सुमारे साडेसहा लाखांचे दहा हजार लिटर पेट्रोल चोरी करण्यात आले होते. हा प्रकार कंपनीच्या सुरक्षा विभागाने मागील आठवड्यात उघडकीस आणला. याबाबत देहूरोड पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती.
…असा झाला उलगडा
घटनास्थळावर पाहणी करीत असताना पोलिसांना एक दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली होती. या दुचाकीच्या नोंदणी क्रमांकावरुन पोलिसांनी मालकाचा छडा लावला असता, या चोरीमागील रॅकेट उघड झाले. हे चौघे पोलिसांना चकवा देण्यासाठी नेपाळ सीमेवरुन परदेशात निसटण्याचा बेत आखत असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांचा बेत उधळून लावला. देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरूण मोरे, उपनिरीक्षक मनोज संकपाळ, कर्मचारी लखनकुमार वाव्हळे, नवनाथ कुर्हे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
…सराईत पेट्रोल चोर
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी बाळू चौघुले आणि रामकुमार उर्फ रामप्रसाद यादव हे दोघे अशाप्रकारे पेट्रोल चोरण्याच्या प्रकारांना सरावले आहेत. सन 2009 मध्येही अशाच प्रकारे पेट्रोल चोरीचा प्रकार तळवडे येथे उघडकीस आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन गोकावे यांनी या प्रकरणात या दोघांना अटक करून त्यांच्याकडून पेट्रोलने भरलेला एक टँकरसह आणखी दोन टँकर जप्त केले होते.