नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात दररोज चढ-उतार होत असते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दरही दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, केंद्राच्या या निर्णयाला फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्सने विरोध दर्शवला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील पेट्रोलपंपचालकांनी बंदची हाक दिली आहे. 16 जूनपासून पेट्रोलपंपचालक देशव्यापी संप पुकारणार आहेत. 16 ते 24 जूनदरम्यान देशभरातील सर्व पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय डिलर्स असोसिएशनने जाहीर केला आहे.
तेल कंपन्यांनी देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी आणि पेट्रोल आणि डिझेलच्या चढ-उताराचा ग्राहकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे ऑइल कंपन्यांनी सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदिगड आणि विशाखापट्टणम या पाच शहरांत 1 मेपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दर बदलण्याचा प्रयोग सुरू ठेवला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हा प्रयोग आता संपूर्ण देशात राबवण्याचा विचार सरकार करत आहे. या बंदनंतरही केंद्राने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर 24 जूननंतरही बेमुदत बंदचा इशारा डिलर्सच्या असोसिएशनने दिला आहे.
तत्पूर्वी भारतातील सर्व तेल कंपन्या 16 जूनपासून देशभरात रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेणार आहेत. म्हणजे संध्याकाळी ज्या किमतीत पेट्रोल भरले असेल त्याच किमतीत तुम्हाला सकाळी पेट्रोल मिळेल याची काही शाश्वती नाही. याचाच अर्थ कधी पेट्रोल स्वस्त असेल तर कधी महाग. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्त्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.