पेट्रोलियम पदार्थही जीएसटीच्या कक्षेत आणणार!

0

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला गंभीर आरोप तसेच अन्य प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. राज्यसभेत पी. चिदंबरम यांनी जीएसटीबाबत सरकारला प्रश्न विचारले. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत का आणले जात नाही. आता केंद्रात व देशातील 18 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, मग अडथळा कुठे येतोय, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार इच्छुक आहे. पेट्रोलचे वाढलेले दर हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. पेट्रोलवर राज्य सरकारही विविध कर आकारतात, असे जेटली यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींनी माफी मागावी
मंगळवारीदेखील विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. दोन्ही सभागृहातील कामकाज तहकूबही करावे लागले. दुपारनंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांनी सभात्याग केला. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्याच्या मेजवानीत सहभागी झाल्यावरुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या बेफाम आरोपांवर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले होते. नरेंद्र मोदींनी माफी मागावी, अशी काँग्रेस खासदारांची मागणी आहे. मंगळवारी दुपारी कामकाज सुरु झाल्यावर केंद्रात सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1,183 कालबाह्य कायदे रद्द केले, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली.

केंद्र सरकार झोपले होते का?
गुजरात निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपने डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांना भेटून नरेंद्र मोदींविरोधात कट रचल्याचा आरोप केला होता. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटत आहेत. डॉ. सिंग हे देशाचे माजी पंतप्रधान होते. त्यांच्याविरोधात केलेल्या आरोपाबाबत मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मंगळवारीही केली. हाच मुद्दा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा उपस्थित करून केंद्र सरकार व भाजपच्या कार्यशैलीवर टीका केली. खरगे म्हणाले, मनमोहन सिंग जेव्हा पाकिस्तानबरोबर कट रचत होते. तेव्हा केंद्र सरकार झोपले होते का? मनमोहन सिंग यांच्याविरोधात अजून गुन्हा का दाखल केला नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी हा खोटा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. सिंग यांच्याविरोधात केलेल्या नाहक आरोपाबाबत मोदींनी माफी मागावी, अशी मागणी करत काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत लोकसभाध्यक्षांच्या वेलमध्ये धाव घेतली.