पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर घटण्याची शक्यता

1

आगामी अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वित्त मंत्रालयापुढे सादर केलेल्या अहवालात पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

पेट्रोल व डिझेलवर भारतात ४० ते ५० टक्के इतका प्रचंड कर आकारण्यात येतो, परिणाम दक्षिण आशियाई देशांमध्ये इंधन सर्वाधिक महाग असलेल्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या भावाने ८० रुपयांची वेस ओलांडली आहे तर डिझेलही प्रति लिटर ६७ रुपयांच्या पुढे आहे. अर्थात, आम्ही असा केवळ प्रस्ताव देऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय अर्थ खात्याच्या अखत्यारीत येतो, असेही पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

आगामी निवडणुकांच्यादृष्टीने पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर सरकारसाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली अर्थसंकल्प सादर करताना पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात करतील, अशी दाट शक्यता आहे.