संशयीताला रेल्वे न्यायालयाने सुनावली 25 पर्यंत आरपीएफ कोठडी ; दुसर्या आरपीएफ उपनिरीक्षकासह अन्य कर्मचारी पसार
भुसावळ- अकोल्याजवळील गायगाव पेट्रोल डेपोतून रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी करणार्या टोळीचा ऑगस्ट महिन्यात उरळ पोलिसांनी पर्दाफाश केला होता. सुरुवातीला सहा जणांच्या टोळीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे अकोला रेल्वे सुरक्षा बलाशी निगडीत असल्याचे कळाल्यानंतर दोन उपनिरीक्षकांसह एका कर्मचार्यालाही आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी शुक्रवारी रात्री दिड वाजता उपनिरीक्षक प्रकाश मगर यांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केल्याने रेल्वे सुरक्षा बलात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, मगर यांना शुक्रवारी दुपारी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर न्या.आर.आर.अहिर यांनी 25 पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावली.
कुंपणानेच खाल्ले शेत
उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी 8 ऑगस्ट 2018 रोजी रेल्वे वॅगनमधील तसेच कंपन्यांच्या डेपोतील पेट्रोल चोरणार्या टोळीला अटक केली हाती. सुरुवातीला साहब खान समशेर खान, सुधाकर भिकाजी रनवरे, अक्षय प्रकाश आगरकर, रूपेश रमेश भाकरे, गणेश रामकृष्ण भाकरे, शिवहरी प्रकाश भाकरे यांना अटक करण्यात आली होती तर अन्य तिघे पसार झाले होते. गायगाव डेपोचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर रेल्वे सुरक्षा बलाने हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशावरून तपासासाठी वर्ग करून घेतल्यानंतर या प्रकारात आरपीएफ कर्मचार्यांचे आरोपींशी लागेबांधे असल्याची बाब निष्पन्न झाली. ज्या रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्यांवर पेट्रोल, डिझेल वॅगनच्या सुरक्षेची व आरोपींवर कारवाईची जवाबदारी होती त्यांनी आरोपींना सहकार्य केल्याची बाब उघड झाल्याने आरपीएफ दलात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना या प्रकरणात 17 आरोपी निष्पन्न झाल्यानंतर 14 आरोपींना अटक करण्यात येवून त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती तर शुक्रवारी रात्री उपनिरीक्षक प्रकाश मगर यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या 15 वर पोहोचली आहे. या गुन्ह्यात संशयीत आरोपी उपनिरीक्षक आर.एन.यादव व कर्मचारी बाबूलाल समाधान ढोकणे हे सुरक्षा बलाला वॉण्डेट असलेतरी ते पसार झाले आहेत तर त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केल्याचेही सांगण्यात आले.
आरपीएफ निरीक्षकासह तिघांचे निलंबन
गायगाव पेट्रोल चोरी प्रकरणाचा शेगाव आरपीएफकडे तपास देण्यात आल्यानंतर चौकशीत हा प्रकार आरपीएफच्या पाठबळामुळेच झाल्याचे समोर आल्यानंतर अकोल्याचे निरीक्षक विनोदकुमार लांजीवार, उपनिरीक्षक प्रशांत मगर, कर्मचारी आर.एन.यादव यांना विभागीय सुरक्षा आयुक्त अजयकुमार दुबे यांनी निलंबित केले होते.
आरपीएफ उपनिरीक्षकाला 25 पर्यंत कोठडी
दरम्यान, अटकेतील आरपीएफ उपनिरीक्षक प्रकाश मगर यांना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर आरपीएफतर्फे अॅड.राजेश रॉय यांनी आरोपीला तीन दिवस आरपीएफ कोठडी देण्याची मागणी केल्यानंतर न्या.आर.आर.अहिर यांनी ती मान्य केली. आरोपींतर्फे अॅड.आर.एम.यादव यांनी युक्तीवाद केला.