फैजपूर। पेट्रोल टँकरला वेल्डींगचे काम करीत असताना टँकरमध्ये वेल्डींगचा धूर पुर्णपणे गेल्याने टँकरखालील भागात आगीने पेट घेतला व त्याचा मोठा स्फोट झाला. यात वेल्डींगचे काम करणारे दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवार 3 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास फैजपूर- सावदा रस्त्यावरील गॅरेजमध्ये घडली. जखमींना फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या घटनेत मात्र या दोनही कामगारांचे प्राण थोडक्यात बचावले.
वेल्डींग मशिनच्या धुरामुळे घडला प्रकार
येथील फैजपूर- सावदा रस्त्याच्या मुस्लीम कब्रस्थानालगत ट्रकची बॉडी दुरुस्तीचे गॅरेज असून सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास रिलायन्स पेट्रोलचे टँकर वेल्डींगचे काम करण्यासाठी आणले असता काम करीत असताना वेल्डींगचा धूर पुर्णपणे टँकरमध्ये जाऊन बाहेर येण्यास मार्ग नसल्यामुळे टँकरने पेट घेतला व मोठा स्फोट झाला. त्यात टँकरचे नुकसान झाले. टँकर क्रमांक एम.एच.19 झेड 1798 हे जळगावचे असल्याचे समजते.
यांना झाली जखम
या घटनेत वेल्डींग काम करणारे शेख शाहीद शेख उमर (वय18), शेख राजीक शेख इमाम (वय 22, दोन्ही रा. फैजपूर) हे जखमी झाले असून त्यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले होते. तर या गॅरेज दुकानाचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सतर्कतेने अनर्थ टळला
या गॅरेजमध्ये टँकरला वेल्डींगचे काम शेख शाहीद शेख उमर, शेख राजीक शेख इमाम हे दोघे करीत असताना वेल्डींग मशिनमधून निघणारा धूर टँकरमध्ये जाऊन आग लागली. यावेळी या दोघांना जखमा झाल्या. शेजारील कामगारांच्या हि बाब लक्षात आली असता त्यांनी लागलीच या दोन्ही कामगारांना उचलून रुग्णालयात दाखल केले. तर अग्निशमन दलास पाचारण करण्यात येऊन अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी आझ विझविली. आग विझविण्यात तातडीने यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला.