मुंबई: पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील घसरण कायम आहे. त्यामुळे देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कपात केली आहे. देशभरात आज पेट्रोल सरासरी १७ पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले. कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव ६३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा दर चालू महिन्यातील नीचांकी स्तरावर आहे.
मागील काही दिवसांपासून इंधन दरात घसरण झाली आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८०. २५ रुपये आहे तर डिझेलचा दर ७१.२५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७४.६५ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६७.८६ रुपये आहे. बंगळूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर ७७.१५ रुपये आहे. डिझेल ७०.१२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७७.५४ रुपये आणि डिझेल ७०.१२ रुपये आहे. हौद्राबादमध्ये पेट्रोल ७९.३८ रुपये असून डिझेल ७३.९९ रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल प्रति बॅरल ६३ डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कपात केली आहे. १२ जानेवारीपासून पेट्रोल दरात घसरण सुरु आहे. चीनमधील विषाणूमुळे तेथील खनिज तेल आयातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारी खनिज तेलाच्या किंमतीत २ टक्के घसरण झाली होती. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धयजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने खनिज तेलाचा भाव ७१ डॉलर प्रति बॅरल पर्यंत वाढला होता.