पेट्रोल, डिझेलच्या दराचा उच्चांक

0

मोठ्या दरवाढीमुळे महागाईही वाढणार

नवी दिल्ली – मुंबई, दिल्लीसह देशभरातील शहरांमध्ये पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी 3 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोल 80 रुपये प्रति लीटर तर, दिल्लीत 70.38 रुपये प्रति लीटर मिळत आहे. कोलकाता, चेन्नईत सुद्धा पेट्रोल, डीझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त झाले असून महागाईवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. डिझेल दरवाढीमुळे महागाई देखील येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे.

दर कमी होतील : प्रधान
या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेत दोन मोठी वादळे आली. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती तर वाढल्याच, शिवाय जागतिक स्तरावर रिफायनरी क्षमता 13 टक्क्यांनी कमी झाली. या सर्व कारणांमुळे पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय दर 18 टक्क्यांनी आणि डिझेलचे आंतरराष्ट्रीय दर 20 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता स्थिर झाल्या आहेत. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता पुढेही दर कमी होतील. कारण जागतिक स्तरावरील परिस्थितीही सामान्य झाली आहे.

जागतिक बाजारात दरांमध्ये घट
देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. गेल्या 3 वर्षांत जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये कमालीची घट झाली. तसेच गेल्या 6 महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया सुद्धा मजबूत झाला. तरीही भारतात पेट्रोल आणि डीझेलच्या किमती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. शेजारील देशांमध्ये आपल्या देशाच्या तुलनेत अतिशय कमी दरात पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे. जुलैपासून मोदी सरकारने डायनॅमिक फ्यूल प्राइसचे सूत्र अवलंबले आहे. त्यामुळे दैनंदिन स्वरुपात पेट्रोल आणि डीझेलचे दर बदलत आहेत. हा निर्णय लागू झाला तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलच्या किमती दिल्लीत 7.29 रुपयांनी वाढल्या आहेत. तर डीझेलच्या किमतीत 5.36 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही दरवाढ मागील तीन वर्षांच्या तुलनेत उच्चांकी ठरली असून यामुळे महागाई मोठ्याप्रमाणात वाढणार आहे.

किंमती वाढण्यास कोण जबाबदार?
पेट्रोल आणि डिझेलवर राज्यांनी सर्वात जास्त कर आकारला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर घसरले होते. मात्र सरकारने त्यावर अनेकदा एक्साईज ड्युटी वाढवली. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या ठरलेल्या दरांनुसार, तर राज्य सरकारकडून टक्क्यांनुसार एक्साईज ड्युटी वाढवली जाते. केंद्र सरकारकडून एक लिटर पेट्रोलवर 21.48 रुपये एक्साईज ड्युटी लावली जाते, तर राज्य सरकारकडून (दिल्ली) 27.5 टक्के याप्रमाणे व्हॅट आकारला जातो. दरम्यान राज्य सरकारने अनेकदा व्हॅट वाढवल्यानेच किंमती उसळल्याचा आरोपही धर्मेंद्र प्रधान यांनी केला. केरळ सरकारने 26 टक्क्याहून 34, महाराष्ट्र सरकारने 27 टक्क्यांहून 40 आणि दिल्ली सरकारने 20 टक्क्यांहून 27 टक्के एवढा व्हॅट वाढवला आहे.