धुळे । पेट्रोल, डिझेलवर वेगवेगळे कर लावल्यामुळे दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना ट्रकद्वारे मालवाहतुक करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या परिस्थितीत ट्रक चालक आणि मालकांना त्यांचे ट्रक उभे करण्यावाचून दुसरा मार्ग उरलेला नाही. पेट्रोल डिझेलवर वेगवेगळे कर, सेस, सरचार्ज संपून जीएसटी लागू करण्यात यावा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करावे लागेल असा इशारा ‘खान्देश ट्रक ओनर्स असोसिएशनने’ दिला आहे.
असा आहे निवेदनातील आशय
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांची सबका साथ, सबका विकास ही संकल्पना पेट्रोलियम पदार्थात दररोजच्या होणार्या वाढीव किंमतीमुळे सबसेल अपयशी ठरली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थाच्या किंमतीत प्रती बॅरल 24 डॉलरपासून 72.5 डॉलरपर्यंत मोदी सरकारच्या काळात गेले आहेत. क्रुड ऑईलपासून पेट्रोल डिझेल मिळवितांना त्याची किंमत जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंत जाते. त्यात केेंद्र राज्य सरकारने कर आकारणी केल्यानंतर पेट्रोल डिझेलची किंमत लिटरला 55 ते 56 रुपये इतकी होते. मात्र केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळे कर, सेस आणि सरचार्ज लावत असल्यामुळे इंधनाच्या किंमती भडकल्या आहेत. अशा परिस्थितीत ट्रक वाहतुक व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारी वेगवेगळे कर सेस आणि सरचार्ज संपवून फक्त जीएसटी लावावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत किसन चौधरी, राजेंद्र लोकरे, जगनसिंग परदेशी, कुलदिपसिंह सरहा, मगन गोसावी, विनोद निंबा पाटील, सुनील पाटील, विशाल बाळू पाटील, भगवान चौधरी, नामदेव प्रल्हाद ठाकरे यांनी केली आहे.