नवी दिल्ली : दररोज नवनवा उच्चांक गाठणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याचा महत्वाचा निर्णय कच्च्या तेलाची उत्पादक संघटना ‘ओपेक’ आणि इतर सहयोगी देशांनी घेतला आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही विक्रमी पातळीवर आहेत. पेट्रोल झपाट्याने ११० रुपयांच्या दिशेने तर डिझेल शंभरीच्या दिशेने कूच करत आहे. इंधन दरवाढीने मागील दोन महिन्यात देशात महागाईचा भडका उडाला आहे.
‘ओपेक’ आणि रशियासह इतर तेल उत्पादकांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज चार लाख बॅरलची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टपासून उत्पादनात वाढ होणार असून ती डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. २० लाख बॅरल प्रती दिन या क्षमतेपर्यंत ही उत्पादन वाढ सुरु राहणार असल्याचे ओपेकने म्हटलं आहे. यात संयुक्त अरब अमिरात, इराक आणि कुवेत या देशांना अतिरिक्त उत्पादनाचा कोटा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही देशांकडून भारत कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे भारताला पुढील काही महिने कच्च्या तेलाचा सुरळीत पुरवठा होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी करोना आणि लॉकडाउनमुळे इंधन मागणीत प्रचंड घसरण झाली होती. त्यामुळे ओपेक सदस्य देशांनी तेलाच्या उत्पादनात प्रती दिन सरासरी १० टक्के कपात केली होती. मात्र यामुळे जागतिक बाजारपेठेतील तेलाचा पुरवठा मर्यादित झाला. गेल्या काही महिन्यात अर्थव्यवस्था सावरू लागली असून इंधन मागणी वाढली आहे. दुसऱ्या बाजूला मर्यादित पुरवठ्याच्या कच्च्या तेलाच्या भाव ७८ डॉलरपर्यंत वाढला होता. तेलाने अडीच वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली होती. सध्या भारत ७३ डॉलर प्रती बॅरलने तेलाची खरेदी करत आहे.
.