पेट्रोल दरवाढीची शक्यता

0

पुणे : महागाईला आळा घालण्याऐवजी ती आणखी गगणाला भिडण्याच्या मार्गावर आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती येत्या काही दिवसांत भडकणार असून, पेट्रोलचा शंभरीचा भडका उडणार आहे. सीरियामधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या किमती अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास रुपया कमकुवत होईल. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, सामान्य व्यक्तीला महागाईचा फटका बसू शकतो. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी सरकारला जास्त पैसे मोजावे लागतील, त्याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर होईल.

पेट्रोल किमत 90 ते 100 रुपये प्रतिलीटर
येत्या काही दिवसांत खनिज तेलाच्या किमती 80 डॉलर प्रतिबॅरल होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका पेट्रोल-डिझेलच्या दरांना बसेल व भारतात पेट्रोलच्या किमती 90 ते 100 रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचतील, असा अंदाज जगातील मोठ्या रिसर्च कंपन्यांपैकी एक जेपी मॉर्गनने वर्तवला आहे. यापूर्वीच कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसेल.