पेट्रोल दरवाढीविरुद्ध पालघरमध्ये बैलगाडी मोर्चा!

0

काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने दणाणून सोडला परिसर, भाजप सरकारवर आरोपांच्या फैरी

पालघर । पेट्रोल डिझेल दरवाढीविरूध्द पालघरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाड्या व घोडागाड्यावर असून आंदोलन केले गेले. महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल दरवाढीचा भुर्दंड सरकार जनतेवर लादत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी भाजप सरकार मुर्दाबाद, नही चाहिये अच्छे दिन- लौटा दो काँग्रेस सरकारवाले दिन अशा घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेल महाग का? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात इंधनावर विविध प्रकारचे कर लावले आहेत. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दरवाढ झाली असल्याचा आरोप केला.

यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी भाजप- शिवसेना सरकारवर टिका करताना २०१३ ला आजचे सत्ताधारी पेट्रोल डिझल भाववाढ झाल्यावर आंदोलने करत होते. तेव्हा पेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थ स्वस्त होऊन सुद्धा पेट्रोलचे भाव जास्त असल्याचे ते म्हणाले. गावित यांनी भाजपा सरकार हातचलाखी करीत असल्याचा आरोप लावला.

यावेळी नगरसेविका डॉ. उज्ज्वला काळे, तालुका अध्यक्ष सिकंदर शेख, माजी पं.स. सदस्य राजेश अधिकारी यांनी आपले विचार मांडले. आंदोलनात माजी नगराध्यक्ष मनोहार दांडेकर, अरविंद सिंग, शैलेश ठाकूर ,संदीप मेणे, चिराग देसाई, सुनील हिंगोले, शैला प्रसाद, संध्या बागुल, अमरसिंग ठाकूर, संगीता धोडे, रसिक भानुशाली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.