पेट्रोल दरवाढ करून जनतेचे शोषण; सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

0

नवी दिल्ली-दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर नवा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. सर्वत्र यावरून सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्ष सरकारची इंधन दरवाडीवरून कोंडी करताना दिसून येत आहे. दरम्यान आता खुद्द भाजपाच्या नेत्यांकडूनच यावर टीका केली जात आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रकाश झोतात राहणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या इंधनाच्या दरांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोलचे दर 48 रुपयांपेक्षा जास्त असणं म्हणजे जनतेचं शोषण आहे, अशी टीका स्वामींनी केली आहे.

पेट्रोलचे कमाल दर 48 रुपये प्रतिलीटर असायला हवे. सरकारने पेट्रोलचे दर 48 रुपयांपेक्षा कमी करायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे वसूल करत असेल, तर ते जनतेचं शोषण आहे, असं स्वामी म्हणाले आहेत.

आज पेट्रोल प्रति लिटरमागे १६ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे २० पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६. ७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५. ७४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे.