पेट्रोल पंपचालकांना मेस्माचा धाक

0

मुंबई । पेट्रोलपंप चालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. आंदोलन झाल्यास सरकारने मेस्मा लावण्याच्या निर्णय घेतला होता, त्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे पेट्रोलपंप चालक संघटनेचे अध्यक्श उदय लोध यांनी सांगितले. त्याचवेळी सरकारच्या या दडपशाहीमुळे पेट्रोलपंप चालक नाराज असल्याचेही लोध यांनी स्पष्ट केले.

अपुर्वाचंद्रा कमिटीद्वारे सहा वर्षापूर्वी केंद्र सरकारने तेल कंपन्यांना पंप चालविण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा तसेच त्यास दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकनुसार वाढ देण्याचे लेखी आदेश दिले होते. असे असताना गेल्या चार वर्षापासून तेल कंपन्यांनी त्याचे पालन केलेले नाही त्यामुळे पंपचालकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही तेल कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नोव्हेंबर महिन्यात देशपातळीवर आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनाच्या दिवशी संघटनेने तेल कंपन्यांना बैठक बोलविण्याची विनंती केली होती. परंतु त्यास तेल कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवार 14 मे पासून प्रत्येक रविवारी महाराष्ट्रातील सर्व पंपचालक सामूहीक सुट्टी घेणार होते. बुधवारपासून महाराष्ट्रातील सर्व पंपचालकांसह सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत फक्त सिंगल शिफ्टमध्ये काम करणार होते. मात्र आंदोलन केल्यास सरकार कारवाई करण्याच्या तयारीत होते. कोणतीही बाजू डिलर्सला मांडू न देता सरकारकडून डिलर्सला आदेश प्राप्त झाले होते. त्यामुळे हे आंदोलन आम्ही पुढे ढकलत असून, याबाबत ऑइल कंपन्यांनी आम्हाला चर्चेसाठी 17 मे रोजी मुंबईत बोलावले असल्याचे उदय लोध यांनी सांगितले.