भुसावळ । उत्तर प्रदेशात पकडलेल्या इंधन चोरीनंतर आता इतरही ठिकाणी यासंदर्भात नागरिकांमध्ये शंकात्मक चर्चा होत आहेत. त्यामुळे सर्वच पेट्रोल पंपांची तपासणी होण्याची गरज निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात यंत्रात चिप बसवून, त्याद्वारे होणारी इंधनचोरी त्यातून ग्राहकांना चुना लावण्याचा प्रकार सोशल मीडियाद्वारे देशात सर्वत्र पोहोचला आहे. त्याबरोबरच यापूर्वी वाहन चालकांमध्ये बदनाम असलेल्या काही पेट्रोल पंपांवरील भेसळयुक्त इंधनाबाबतच्या शंकेत पुन्हा पेट्रोल चोरीच्या शंकेची भर पडली आहे. याकडे तहसिल प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
वाहन धारकांमध्ये अस्वस्थता
यापूर्वी भेसळयुक्त इंधन मिळत असल्याच्या संशयावरुन काही पेट्रोल पंपांवर विशिष्ट वाहनधारक इंधन भरत नसल्याचे चित्र होते. त्यात आता चिप बसवून करण्यात येत असलेली पेट्रोल चोरी माध्यमांद्वारे बघून वाहन धारकांमध्ये अस्वस्थता पुन्हा वाढीस लागलेली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावरील इंधन भरण्याच्या यंत्रांची तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र त्यातही चिरीमिरीच्या माध्यमातून दुर्लक्ष केले जाते की काय, अशाही शंका व्यक्त होत आहेत.