नवी दिल्ली : पेट्रोलियम पदार्थ, रिअल इस्टेट, इलेक्ट्रिसिटीसह अन्य काही घटकांचा वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) समावेश करण्याचे विचाराधीन आहे, अशी माहिती वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेचे प्रमुख सुशीलकुमार मोदी यांनी दिली. ‘फिक्की’च्यावतीने आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.
पेट्रोल, रिअल इस्टेट 25 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये!
मोदी म्हणाले, की पेट्रोल, रिअल इस्टेट, मुद्रांक शुल्क, इलेक्ट्रिसिटीसह अन्य घटकांचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. पेट्रोलियम पदार्थांचा जीएसटीमध्ये समावेश झाल्यास पाचव्या उच्चकराच्या स्लॅबमध्ये याचा समावेश करण्यात येईल. जीएसटीचे सध्या 0, 5, 12, 18 आणि 28 टक्के असे स्लॅब आहे. 28 टक्क्यांचा स्लॅब 25 टक्के करण्यात येणार असून, 12 आणि 18 टक्क्यांचे स्लॅब एकत्रित केले जातील. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांना 25 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये ठेवण्यात येईल. जीएसटी परिषदेमध्येच याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मूल्यवर्धित करांचाही जीएसटीत अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान,, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर गेल्या चार महिन्यांत सुमारे 3 लाख 20 हजार करदात्यांनी परतावे भरले असून, आणखी प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.