पेट्रोल 4, डिझेल 6 रुपयांनी भडकले!

0

अच्छे दिन : या वर्षातील सर्वात मोठी दरवाढ

पुणे : पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्याचे काहीही नाव नसून, त्याबद्दल केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची भावना असतानाच, आता पेट्रोल प्रतिलीटरमागे चार रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटरमागे सहा रुपयांनी महागले आहे. या वर्षातील ही उच्चांकी दरवाढ आहे. राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलचे दर 74.08 रुपये प्रतिलीटर एवढे होते. तर डिझेल 65.31 पैसे प्रतिलीटर इतके होते. तर पुण्यात पेट्रोल 81.93 रुपये प्रतिलीटरवर जाऊन पोहोचले होते. मुंबईतदेखील हीच किंमत होती.

मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक दरवाढ
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. कच्च्या तेलाचा दर प्रत्येक दिवशी बदलत असतो. तथापि, पेट्रोल व डिझेलवरील अतिरिक्त कर आणि रुपयाचे झालेले अवमूल्यन या बाबी पाहाता, सप्टेंबर 2013 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इंधनाचे दर वाढलेले आहेत. देशात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून इंधनाचे भाव सातत्याने वाढत असून, 2014नंतर कच्च्या तेलाच्या किमतीही सर्वाधिक राहिल्या आहेत. अमेरिका व युरोपीय युनियनकडून इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याची शक्यता व सीरियातील गृहयुद्ध यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे कच्चे तेल सद्या 73.78 डॉलर प्रतिपिंप इतके झाले आहे. तरीही हे दर यूपीए सरकारच्या कालावधीपेक्षा कमीच आहेत. तरीही दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

जीएसटीनंतर आणखी भडकणार!
देशात पेट्रोल व डिझेलचे दर दररोज बदल असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल 50 तर डिझेल 90 पैशांनी महागले होते. तर या वर्षाच्या सुरुवातीला चार महिन्यांतच पेट्रोलची किंमत चार रुपयांनी तर डिझेलची किंमत पाच ते सहा रुपयांनी वाढली आहे. कोणत्याही वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली नव्हती. दरम्यान, सद्या असलेल्या करांव्यतिरिक्त जीएसटीदेखील पेट्रोल व डिझेलवर लावण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याने इंधनाचे दर बरेच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.