मुंबई:- महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या पेट्रोल, डीझेल व इतर पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्यांकडून वसूल केला जाणारा स्टेट स्पेसिफिक सरचार्ज (राज्य विशेष अधिभार) रद्द झाला असून त्यामुळे राज्यात पेट्रोल प्रती लिटर 60 पैसे व डीझेल प्रती लिटर 1 रुपये 35 पैशांनी स्वस्त होणार आहे.
राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत घोषणा केली. महाराष्ट्रात मुंबईत तेल कंपन्यांच्या दोन रिफायनरीज आहेत. या रिफायनरीमध्ये आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर मुंबई महानगरपालिका दरवर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपये जकात वसूल करत होती. या वसुलीपोटी महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या पेट्रोल, डिझेल व इतर पेट्रोलियम पदार्थांवर तेल कंपन्या स्टेट स्पेसिफिक सरचार्ज वसूल करत होत्या. राज्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर तेलावरील मुंबई महानगरपालिकेची जकात रद्द झाली. मात्र तरीही तेल कंपन्या सरचार्ज वसूल करत असल्याची तक्रार पामफेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी ग्राहक संरक्षण विभागाकडे नुकतीच केली होती. याची दखल घेत ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हा मुद्दा मांडला.
जीएसटीद्वारे महाराष्ट्रातील जनतेला प्रत्यक्ष फायदा व्हावा यासाठी पेट्रोल व डीझेलवरील स्पेसिफिक सरचार्ज रद्द करण्यात यावा अशी मागणी गिरीश बापट यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा अधिभार येत्या पाच दिवसांत रद्द करण्याचे आदेश प्रधान यांनी दिले होते. यानुसार सोमवार दि. 10 जुलैपासून सदर अतिरिक्त अधिभार रद्द झाला असून त्यामुळे पेट्रोल प्रती लिटर 60 पैसे व डीझेल प्रती लिटर 1 रुपये 35 पैशांनी स्वस्त झाले असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.