पेणमधील गावठी दारुच्या हातभट्ट्या केल्या उध्दवस्त

0

पेण । पेण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांचगणी-बांगलावाडी, असानी व वेताळपट्टी या डोंगराळ भागात गावठी दारुच्या हातभट्ट्या राजरोसपणे सुरु आहेत अशी माहिती पेण पोलिस निरीक्षक धनाजी क्षिरसागर यांना मिळताच पेण पोलीस रवींद्र मुंडे, मिलिंद पाटील, भीमराव चौरे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भास्कर पाटील, नागा पिंगळा, बाळू ठाकरे, जयराम ठाकरे त्यांच्यासह पोलिस पथकांने डोंगराळ भागात छापा टाकला असता त्या ठिकाणी अवैध गावठी दारु व दारू बनविण्याचे साहित्य आढळून आले. सदर दारू त्या ठिकाणीच नष्ट करण्यात आली.

१ लाख १६ हजारांचा माल हस्तगत
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये गावठी दारु बनविण्यासाठी लागणारा नवसागर, काळा गुळ व इतर साहित्य हे संपूर्ण नष्ट करण्यात आले. या धडक कारवाईत पोलिस चौरे, रवी मुंढे, पवार, पाटील व बोरगाव येथील पोलिस पाटील, भास्कर पाटील यांच्या स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे पेण तालुक्यातील अवैध धंद्याना चांगलाच चाप बसला असून अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.