पेण । पेण तालुक्यातील वडखळ येथे अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत बुधवारी सायंकाळी सुमारे 10 लाख रुपयांचा गुटखा व दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यात गुटखाबंदी असताना छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू आहे. रायगड जिल्ह्यातही गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस स्टेशन हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत गुटख्याची तस्करी करणार्या 2 गाड्यांसह एकाला अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या गुटख्याची किंमत 9 लाख 41 हजार 796 रुपये असून, गाड्यांची किंमत 15 लाख 85 हजार 500 रुपये आहे.
गुटख्याचे नमुने लॅबमध्ये
1 पेण, खाटिक आळी येथील गुटख्याचा मुख्य व्यापारी गुड्डू उर्फ शहजाद शेख हा अवैधरीत्या गुटखा विक्रीस घेऊन येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला लागली होती. त्यानुसार वडखळ नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांच्या पथकाने सापळा रचला होता.
2 वडखळ नाक्यावर (जीए 05 टी 3887) व ( एमएच 06 बीजी 5229) हे दोन टेम्पो आले असता अन्न व औषध प्रशासनाने अडवले. यावेळी तपासणीत विमल गुटखाचा अवैध माल विक्रीसाठी नेत असल्याचे समजले. अन्न व औषध प्रशासनाने या कारवाईत शहजाद शेख याला ताब्यात घेतले आहे. गुटख्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.