पेण: पेण एसटी आगारात सध्या नादुरुस्त भंगार गाड्या मोठ्या प्रमाणात असल्याने रोज काही फेर्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे वृत्त आहे. पेण हे रायगड जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सर्वानाच सोईस्कर ठरत आहे. पेण तालुक्यातील सुमारे 350 गावातील हजारो नागरिकविविध कामांसाठी पेण आगारातून प्रवास करतात तसेच पनवेल, कल्याण, बदलापूर, मुंबई, ठाणे, तसेच नागोठणे,पाली, रोहा, महाड, श्रीवर्धन या परिसरातून नोकरी निमित्त ये-जा करतात. त्यामुळे रोज सकाळ-संध्याकाळी पेण बसस्थानकात प्रचंड गर्दी असते मात्र पेण बसस्थानकात 35 ते 38 एसटी बसेस असल्याने त्यापैकी बर्याच बसेस या मध्येच बंद पडतात परिणामी अनेक फे-या रद्द होत असल्याच्या घटना घडत असल्याने यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे. आणि पेण आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
बसेसना आगारातील चालक व वाहकही कंटाळले
या बसेसना आगारातील चालक व वाहकही कंटाळले आहेत. सदर बसेस बंद पडत असल्याने आम्ही पुढील फेर्या कशा पुर्ण करणार ? असा सवाल चालक विचारीत आहेत तर पेण आगारामार्फत 65 शेड्युल चालवले जातात त्यामुळे फक्त 25-30 गाड्यांवर आगार कसा चालवायचा असा प्रश्न येथील अधिकारी वर्गाला पडला आहे. पेण एसटी आगाराला लवकरात लवकर नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी केली आहे.