पेण । तालुक्यातील वढाव गावाला जोडणार्या वढाव काळेश्री पुलाची बिकट अवस्था झाली आहे. हा पुल शेवटचा घटका मोजत असल्याचे नागरीक सांगत आहेत. या पुलाचा खालचा भाग कधीही पडण्याच्या परिस्थितीत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पेण तालुक्यातील खारेपाट हा भाग शासन दरबारी दुर्लक्षितच आहे. कधी पिण्याच्या पाण्याची बोंब, तर कधी खराब रास्त्यांची. 20 ते 25 गाव आणि वाड्याचा समावेश खारेपाट विभागात होतो. 10 ते 12 हजार लोकवस्ती येथे आहे. महाड येथील सावीत्री नदीवरील पुल कोसळून वाहून गेल्याच्या घटनेने अनेक प्रवाशांचा बळी घेतला होता. महाड येथील दुर्घटना पुन्हा कोठेही घडू नये म्हणून शासनाने अनेक पुलाचे ऑडिटही केले, पण कोणतीही करवाई प्रशासनाकडून झालेली दिसत नसल्याचे येथील प्रवाशांचे म्हणने आहे. वढाव काळेश्री पुल हा काळेश्री, भाल, विठ्ठलवाडी भाल, तुकाराम वाडी, कान्होबा, जनवली, मंत्रीबेडी, बहीरामकोटक व ईतर बेडी याना जोडणारा आहे. या पुलावरून रोज शेकडो वाहने व ग्रामस्थ ये-जा करत असतात.
गावांचा संपर्क तूटणार
या पुलाचा खालचा भाग कोसळण्याच्या अवस्थेत आहे. एखादे वाहन पुलावरून गेल्यावर पुलाच्या खालच्या भागाचे मोठ मोठे तुकडे खाली गळून पडतात. या गावातील ग्रामस्थांना वाहतूक करण्यासाठी या पुलाशिवाय दुसरा पर्याय नाही. हा पुलच तुटला तर या गावांचा पेण तालुक्याशी संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुलाच्या खाली ग्रामस्थ मासेमारी करत असताना पुलाच्या खालचा भाग अंगावर कोसळला तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सदर पुलाच्या काळेश्रीकडे जाणार्या उजव्या कठडयाचे दोन वर्षापुर्वी काम केले आहे व डाव्या बाजूचा कठडा तसाच अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच मोठेवढाव येथील पुलावर जड वाहनांना बंदी असे फलक एक वर्षापुर्वी लावले आहे. भाल येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून कठडे गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. थोडक्यात खारेपाट विभागातील अनेक पुलांची परीस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.