अलिबाग (प्रणय पाटील) : पेण म्हणजे गणपती बाप्पाचं गाव. येथील घराघरात गणपती मूर्ती बनविण्याचे कारखाने सुरु असतात. इथल्या मूर्तिकारांनी घडविलेल्या मूर्ती नेहमीच खास असतात. या मूर्ती आजूबाजूच्या गावांसह थेट जगाच्या कानाकोपऱ्यातील देशात मागवल्या जातात. या परिसरात सुमारे 30 लाख गणपती मूर्ती तयार करण्यात येत असून, त्यामधून 90 कोटींची उलाढाल होत असते. येथील गणपतींची उलाढाल कशी चालते, मूर्तीकारांना कोणत्या समस्या भेडसावतात याचा आढावा घेतला आहे, प्रणय पाटील यांनी… सुबक आखणी, नेटकी बैठक, सुंदर कोरीवकाम, डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे स्वतची खास ओळख असणारा पेणचे गणपती हा सातासमुद्रापल्याड पोहोचला आहे. पेण मधील हमरापूर, जोहे या गावांमध्ये घराघरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. आता हा व्यवसाय परिसरातील गावांमध्ये तसेच पेण शहरातही विस्तार करु लागला आहे. गणेशोत्सवाचे 10 दिवस आणि पितृपक्षातील 15 दिवस सोडले तर वर्षभर त्या ठिकाणी गणपती मुर्ती बनवण्याचे काम चालते. पेणमध्ये सुमारे 400 गणपती मूर्ती तयार करण्याचे कारखाने आहेत.
साचे, मातीकाम, आखणी, आकार, आसन, अलंकार, डोळे कोरणी, हातातील आयुधे, बैठकीचे आसन-सिंहासन, महिराप तसेच बालमूर्तींपासून सार्वजनिक मूर्तींपर्यंतची विविध आकारातील मांडणी हे या पेणचे वैशिष्ट्य होय. कसबी कारागीर आणि नैसर्गिक वाटावे असे रंगकाम या साऱयांमुळे पेणच्या मूर्ती या महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे प्रतीक मानल्या जातात.
गणेशमूर्तींना सुरुवात कशी झाली
पेण मध्ये गणपती मूर्ती बनविण्याच्या कामाला नेमकी कधी सुरुवात झाली याची माहिती कुणाकडेही उपलब्ध नाही. मात्र साधारण या परिसरात दीडशे वर्षांपूर्वी गणपती मूर्ती बनविण्याचे काम सुरु असल्याची माहिती मूर्तीकार देतात. पूर्वी पेणमध्ये जोशी, टिळक, परांजपे यांच्यासारखे काही वतनदार राहत होते. त्यांच्याकडे विजापूरहून आलेले काही कारागीर काम करत होते. आपले कामकाज आटोपल्यावर हे लोक फावल्या वेळात मातीची खेळणी, भांडीआणि मूर्ती बनवत असत. कोकणात जाणारे चाकरमानी या वस्तू व मूर्ती पेणमधून घेऊन जात असत. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव परंपरेला सुरुवात केल्यानंतर या मूर्तीकलेला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. मातीची खेळणी, भांडी हळूहळू बंद होत गेली आणि गणपती मूर्ती बनवण्याची कला नावारूपास आली. पेणमध्ये घरासमोरील मातीतून छोटय़ा आणि सुबक गणपती मूर्ती तयार होऊ लागल्या, याच दरम्यान कोकणात गणेशोत्सवाचे महत्त्व वाढत गेल्याने पेणच्या गणेशमूर्तीना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली.
गणेशमूर्तींना दिवसेंदिवस वाढती मागणी
सुबक मूर्ती आणि आकर्षक रंगसंगतीमुळे पेणच्या गणपती मूर्तीची मागणी वाढत चालली आहे. सुरुवातीला कोकण, त्यानंतर मुंबई-पुण्यात पेणच्या गणपती मूर्ती विक्रीसाठी जाऊ लागल्या. त्यानंतर हळूहळू राज्यभरातून पेणच्या गणपती मूर्तीना मागणी येण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दशकांत या मूर्तीची लोकप्रियता इतकी वाढली की कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातूनही पेणच्या गणपती मूर्तीना नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली. महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये सुमारे 25 लाख गणपती मूर्ती निर्यात करण्यात येतात. अगदी अलीकडच्या काळात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशस या देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांकडून आता पेणच्या गणपती मूर्तीना मागणी आहे. दरवर्षी जवळपास 40 हजार गणपती मूर्ती या देशांमध्ये निर्यात केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे वर्षां गणिक इथल्या मूर्तीना मागणी वाढते आहे.
दिवसेंदिवस गणेशमूर्ती कारखान्यांची संख्या वाढतेय
मूर्तींच्या वाढत्या मागणीबरोबरच येथील गणपती मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांची संख्या देखील वाढत आहे. पेण शहरासह हमरापूर, जोहे, दादर, वडखळ या परिसरातही गणेशमूर्तीचे अनेक कारखाने सुरू झाले आहेत. कच्च्या गणेशमूर्तींची मोठी बाजारपेठ म्हणून जोहे, हमरापूर परिसराकडे पाहिले जाऊ लागले आहे. राज्यभरातील मूर्तिकार येथील कच्च्या मूर्ती विकत घेण्यासाठी दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे गणपतीच्या कारखान्यांची संख्याही वाढत आहे. पेण तालुक्यातील 20 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
मूर्तिकारांसमोरील आव्हाने
पेणमध्ये देवधर, हजारे, समेळ, वडके, पाटील, भगत आणि परांजपे यांच्या चार पिढय़ा या व्यवसायात कार्यरत आहेत. मात्र त्यांची पुढची पिढी या व्यवसायात राहील की नाही याबाबत मात्र साशंकता आहे. पेणच्या गणेशमूर्तीना जगभरातून मागणी असली तरी या पुढील काळात हा व्यवसाय करणे जिकिरीचे होणार असल्याचे मूर्तिकार सांगतात. कारण दिवसेंदिवस गणेशमूर्ती कारखान्यांची संख्या वाढते आहे. मूर्तीकामासाठी चांगले मूर्तिकार आणि कुशल कारागीर मिळणेही
कठीण झाले आहे. आजचा कारागीर उद्या आपल्याकडे येईल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. तर दुसरीकडे हाताने मूर्ती घडवणारे मूर्तिकार कमी होऊन साच्यातून मूर्ती काढणाऱ्या मूर्तिकारांची संख्या झपाटय़ाने वाढत चालली आहे. जादा गणेशमूर्ती तयार करण्याच्या नादात मूर्तीचा दर्जाही घसरत जातो आहे. गणपती व्यवसायाला संघटित स्वरूप देण्याचे सर्व प्रयत्नही फसले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने आणि त्या तुलनेत मूर्तीच्या किमती वाढत नसल्याने व्यवसायातील फायदा कमी होत चालला आहे.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्याकडे मूर्तीकारांचा कल
पूर्वी पेणच्या गणेशमूर्ती या फक्त शाडूच्या मातीपासून बनवल्या जात असत. आता मात्र इथल्या 90 टक्के गणेशमूर्ती या केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जाऊ लागल्या आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यास लागणारा वेळ आणि त्यांचा नाजूकपणा यामुळे मूर्तिकार प्लास्टरकडे वळले आहेत. प्लास्टरच्या मूर्ती वजनाने हलक्या, मातीच्या तुलनेत मजबूत आणि फिनिशिंगसाठी चांगल्या असल्याने मूर्तिकारांनी प्लास्टरचा पर्याय स्वीकारला आहे. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या आहेत. तसेच शाडूच्या मातीच्या मूर्तीपेक्षा प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्तीची किंमत निम्मी आहे.
पेण शहरातील निवडक मूर्तिकार सोडले तर आज सर्वत्र प्लास्टरच्या मूर्तीच बनवल्या जात आहेत. पेण तालुक्यातील जोहे आणि हमरापूर ही गावं तर कच्च्या गणपतींची गावं म्हणून नावारूपास आली आहेत. अलीकडे गणपतीच्या मूर्ती तयार करून रंगकाम न करताच या ठिकाणाहून विकल्या जात आहेत. अगदी अध्र्या फुटापासून ते दहा फुटांपर्यंतच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती उपलब्ध असल्याने, राज्यभरातील गणपती मूर्ती विक्रेते तसेच मूर्तिकार या ठिकाणी
कच्च्या मूर्ती खरेदीसाठी येत असतात.
मातीपासून गणपती मूर्ती साकारणारा अवलिया
गणपतींचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये वर्षाला 25 लाख गणपती मूर्ती तयार करण्यात येत असल्या तरी येथे पर्यावरणपुरक शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती अत्यंत कमी संख्येने बनत आहेत. निधी आर्ट या कारखान्याच्या सचिन भगत यांनी मात्र पर्यावरणाचा ध्यास घेतला आहे. शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्यासाठी लागणारा वेळ, जादा मेहनत, महागाईमुळे शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याचे प्रमाण कमी होत असताना, भगत हे मात्र आपल्या कारखान्यात केवळ शाडूच्या मातीपासूनच गणपती मूर्ती तयार करित आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेला व्यापक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली गणपतींची मागणी वाढली आहे. त्यामुळे पेणमधील शाडूच्या मूर्तीना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती आणि त्यांच्या सजावटीसाठी वापरलेल्या रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे पर्यावरणाला पूरक ठरणाऱ्या शाडूच्या मातीने बनवलेल्या गणेशमूर्तीच बनवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने केले आहे. काही सामाजिक संघटनाही पर्यावरण पूरक गणेशमूर्तीसाठी पुढे आल्या आहेत. त्यामुळे शाडूच्या गणपतींची मागणी पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
हमरापूर गावातील सचिन भगत यानेही पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती करण्याचा ध्यास घेतला आहे. भगत यांच्या निधी आर्ट या गणपती मूर्ती कारखान्यात फक्त शाडूच्या मातीपासूनच गणपती मूर्ती तयार करण्यात येतात. या मूर्तींचे रंगकाम करतानाही नैसर्गिक रंग वापरण्यात येत असल्याचे भगत यांनी सांगितले. भगत यांच्या कारखान्यात यावर्षी 600 गणपती मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
मातीची पूजा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. तसेच शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करावी, असा उल्लेखही पूराणात आहे. मात्र शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करणारे कारागिर कमी आहेत. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती तयार करणारे कारागिर वाढले आहेत. त्यामुळे पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींची आवश्यकता असली तरी, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे भगत सांगतात.
शाडूच्या मातीची एक मूर्ती, आखणी तसेच रंगकाम करुन तयार करण्यास एका कारागिराला किमान तीन दिवस लागतात. त्या मानाने प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती एका दिवसात तयार करता येते. पेण गणपती मूर्तींना असलेली मागणी लक्षात घेता. शाडूच्या मातीपासून एवढ्या मूर्ती तयार करणे शक्य नाही. त्यामुळे मातीपासून गणपती मूर्ती तयार करणारे कारागिर तयार केले पाहिजेत, असे सचिन भगत यांनी सांगितले.
गतीमंद मुलांना मिळाला व्यवसाय
मुंबईतच नव्हे तर परदेशातही पेण नगरीतून जाणाऱ्या गणपती मुर्तींच्या पायाजवळ असलेले उंदीर पेण शहरातील गतीमंद प्रौढ आणि मुले घडवित आहेत. पेण येथिल आई डे केअर या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेत सुमारे 30 प्रौढ आणि मुले या संस्थेत शिकतात. संस्थेच्या संचालिका स्वाती मोहिते यांनी गणपती मूर्तीकार दिपक समेळ यांच्याकडे आपल्या संस्थेतील गतीमंदांसाठी काम मागितले. समेळ यांनीही प्रतिसाद देत गतीमंदांना गणपती मूर्तींच्या पायाजवळ असणारा उंदीर बंनविण्याचे काम दिले. या मुलांना प्रशिक्षणही देण्यात आले. गणेशोत्सव काळात उंदीर बनवून प्रत्येक गतीमंदाची 8 ते 10 हजार इतकी कमाई होते.
पेणमध्ये साधारण 400 गणपती मूर्ती कारखाने असून, 30 लाख गणेशमूर्ती तयार करण्यात येत आहेत. गणपतीमूर्ती उद्योगाला विशेष उद्योगाचा दर्जा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कुशल कामगारांची कमतरताही भेडसावत आहे. येथील गणपती मूर्तींना देश विदेशात मागणी आहे. तसेच गणपती मूर्तीकारांमध्ये अद्याप संघटनाचा अभाव असल्यानेही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. येथे प्रत्येक गावातील गणपती मूर्ती कारखानदारांची संघटना आहे. सर्व संघटनांनी एका छत्राखाली येणे गरजेचे आहे.
– श्रीकांत देवधर
अध्यक्ष, श्री. गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळ.
आम्ही मागील 25 वर्षांपासून हमरापूर येथे गणपती कारखाना सुरु आहे.वर्षाला 16 ते 17 हजार गणपती मूर्ती आमच्या कारखान्यात तयार होताता. प्लॅस्टर आॅफ पॅरिस व रंगांच्या किंमतीत वाढ झाल्याने चालू वर्षिही गणपती मूर्तींची किंमत वाढली आहे. शाडूच्या मूर्तींना मागणी आहे, मात्र कारागिरांअभावी या मूर्ती तयार करता येत नाहीत. 1 फूटापासून 12 फूटांपर्यंत आम्ही मूर्ती तयार करतो. व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतो.
– रामलाल पाटील
मालक, कृणाक कला केंद्र
हमरापूर जोहे परिसरात साधारण 300 गणपतीचे कारखाने आहेत. त्यामुळे आमच्या सारख्या कारागिरांना रोजगार निर्माण झाला आहे. दररोज केलेल्या कामानुसार आम्हाला मजूरी मिळते. प्रत्येक एक फुट प्रमाणे 100 रुपये मजूरी आहे. दिवसाला 400 ते 500 रुपये मजूरी मिळते.
– मधुकर घरत
कामगार, साहित्य कला केंद्र
आम्ही पूर्वी दुसऱ्या कारखान्यात काम करायचो, मात्र आता आम्ही भावांनी मिळून स्वत:चा गणपती कारखाना सुरु केला आहे. पेणमधील गणपती मूर्तींना सर्वत्र मागणी आहे. आमच्या कारखान्यात 4 हजार गणपती मूर्ती तयार केल्या असून, त्यामधील बहुतांश मूर्ती यापूर्वीच विकल्या गेल्या आहेत.
– जयेंद्र पाटील
वेदिका आर्ट
हमरापूर व जोहे परिसरातील गणपती मूर्तींचा व्यवसाय पेण शहरातही फैलावला आहे. पेण शहरातील आमच्या कारऱान्यात 3 हजार 500 गणपती मूर्ती तयार होतात. या मूर्ती देशभर विक्रीसाठी जातात. प्लॅस्टर आॅफ पॅरिस व शाडूच्या मातीच्या गणपती मूर्तींमध्ये यावर्षी 10 टक्के वाढ झाली आहे. मूर्तीकाम करतान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मूर्तीकारांमध्ये एकजूट नसल्याने अडचणींवर मार्ग निघत नाही.
– वसंत चव्हाण
अर्चना कला केंद्र