पेण येथील लेखाधिकारी कार्यालयाचे अलिबाग येथे स्थलांतर

0

मुंबई– खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतन निश्चीती व वेतन पडताळणी कार्यालय पेण येथे कार्यरत आहे. हे कार्यालय अलिबाग येथे स्थलांतरीत करण्यासाठी पंचायत समितीच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास महिन्याभरात हलविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिले. विधानसभेत सुभाष उर्फ पंडीतशेठ पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

या लक्षवेधीला उत्तर देतांना विनोद तावडे म्हणाले अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, अलिबाग या कार्यालयाकडून जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन मंजूर केले जात नाही. केवळ खासगी अनुदानीत शाळांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतन देयके या कार्यालयात सादर केली जातात. हे कार्यालय अलिबाग जिल्हा रायगड येथेच आहे. लेखाधिकारी(शिक्षण), पेण, जिल्हा रायगड या कार्यालयामार्फत खासगी अनुदानीत शाळांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतन देयके मंजूर करण्याचे या कार्यालयाशी संबंधित नाही. दरम्यान लेखाधिकारी पेण, जि.रायगड या कार्यालयास पंचायत समिती, अलिबाग येथे जागा उपलब्ध करून दिल्यास महिन्याभरात या कार्यालयाचे स्थलांतर केले जाईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.