पेन अर्बन बँक घोटाळ्यात सहकार्य केल्याने देशपांडे दाम्‍पत्‍याला अटक

0

मुंबई- पेण अर्बन बँक कोट्यावधी रूपयांच्‍या घोटाळयातील मुख्‍य आरोपींना सहकार्य केल्याने पेण मधील शैलेश देशपांडे व प्रज्ञा देशपांडे या दाम्‍पत्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. त्‍यांना न्‍यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे दोघेही बँकेच्‍या उच्‍चस्‍तरीय कमिटीचे प्रमुख सदस्‍य संतोष श्रुंगारपुरे यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

बँकेने वाटप केलेल्‍या कर्जातून ज्‍या मालमत्‍ता खरेदी केल्‍या होत्‍या त्‍यापैकी काही जमिनी या दाम्‍पत्‍याच्‍या नावावर खरेदी करण्‍यात आल्‍या आहेत. शैलेश देशपांडे यांच्‍या नावावर ३३ एकर तर प्रज्ञा देशपांडे यांच्‍या नावावर सहा एकर अशी एकूण ३९ एकर जमीन खरेदी करण्‍यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच या गैरव्‍यवहारातील मुख्‍य आरोपी अध्‍यक्ष शिशिर धारकर व तज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. बँकेच्‍या बेनामी कर्जातून १३१ एकर जमीन ठिकठिकाणी विकत घेतल्‍याचे आतापर्यंत समोर आले आहे. सन २०१५ मध्‍येच न्‍यायालयाने या जमिनी विकून ठेवीदारांचे पैसे द्या असे आदेश दिले होते. परंतु अद्याप त्‍याची अंमलबजावणी झालेली नाही. दरम्‍यान या प्रकरणात आणखी काही जणांना लवकरच अटक होण्‍याची शक्‍यता आहे .