पेपरफुटीप्रकरणी चौकशी समिती नेमणार

0

समितीच्या शिफारशीनंतर होणार कारवाई

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या पेपरफुटीप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे. समितीच्या शिफारसीनंतर संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, पेपरफुटी झालेल्या विषयांची परीक्षा 7 आणि 8 मार्चला होणार आहे. विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या 15 आणि 16 फेब्रुवारीला झालेल्या विषयाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर संबंधित विषयाच्या पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

पुन्हा परीक्षा द्यावे लागणे हे दुर्दैव

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. ’व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली. पेपरफुटीचा प्रकार अतिशय गंभीर आहे. विद्यार्थ्यांची चूक नसताना पुन्हा परीक्षा द्यावे लागणे, ही दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणात परीक्षा विभागाची चूक झाली आहे, हे निश्चित आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रहाची मागणी काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी मांडली. डॉ. करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सत्यशोधन समितीच्या अहवालानंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमध्ये चौकशी समिती नेमण्यावर एकमत झाले. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती राहील.