प्लास्टिकला पर्याय म्हणून वर्तमान पत्राच्या रद्दीतून देतात भाजी
नागरिकांची कॅरीबॅगची अजून सवय मोडली नाही
सांगवी : महाराष्ट्र सरकारने 19 मार्च पासून प्लास्टिक बंदीचा निर्णय अंमलात आणायला सुरूवात केली आहे. नुकत्याच झालेल्या या कायद्यामुळे प्लॅस्टीक बंदीचा सर्वांनी धसका घेतला आहे. हा कायदा लागु झाल्यानंतर सांगवी, पिंपळे गुरव परिसरात बहुतांश ठिकाणी याची अंमलबजावणी होताना दिसते आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार जनप्रबोधनाचे काम सुरू आहे. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून येथील भाजी मंडई व बाजारपेठेत प्लास्टिक बंदीचा निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसते आहे. त्यामुळे दुकानदार, किरकोळ विक्रेते, भाजीवाले-फळवाले आदी प्लास्टिकचा वापर टाळताना दिसत आहेत. प्लास्टिकला पर्याय म्हणून पेपर बॅग्ज वापरू लागले आहेत. भाज्या, फळे, दुकानदार सर्वच पेपर बॅग्ज वापरण्यावर भर देत आहेत.
रद्दी पेपरमध्ये भाजी देतात
या परिसरातील भाजी व्यावसायिकांनीही ‘प्लास्टिक बंदीमुळे कॅरीबॅग बंदी’ असे फलक हातगाड्यांवर लावले आहेत. मात्र लोकांना अजुनही या कॅरीबॅगची सवय सुटत नाही, असे दिसते. अजुनही नागरिक कापडी पिशव्या आणत नाहीत. कॅरी बॅग सवयीचा भाग बनल्याने त्यांना कापडी पिशवी आणणे जमत नाही. ते तसेच भाजी खरेदीसाठी येत असतात. अशा ग्राहकांसाठी सांगवी परिसरात अशा ग्राहकांसाठी जुनी सांगवीत भाजी विक्रेत्यांनी पेपर रद्दी ठेवण्यास सुरूवात केली आहे. तर बाजारपेठेतील मिठाईची दुकाने, फळविक्रेत्यांनी काही महिला बचत गटांकडून स्वःताच्या नावाच्या कागदी पिशव्या तयार करण्याच्या ऑर्डर दिल्याचे समजते. अनेक नागरीक नेहमीच्या सवयीप्रमाणे भाजी खरेदीसाठी बाजारात येतात, मात्र बाजारात पोचल्यावर प्लॅस्टीक बंदी असल्याचे लक्षात येते. परत घरी जाऊन पिशवी आणण्यापेक्षा असे नागरिक भाजी विक्रेत्यांना तुच काहीतरी व्यवस्था कर असे सांगतात. त्यामुळे येथील बहुतांश भाजी विक्रेत्यांनी रद्दी पेपर ठेवले आहेत. अशा कापडी पिशवी विसरून आलेल्या ग्राहकांना आम्ही पर्याय म्हणून रद्दी पेपरमध्ये भाजी देतो. कापडी पिशवी परवडत नसल्याने पेपर रद्दीचा मार्ग सोपा वाटतो, असे भाजी विक्रेते पांडुरंग पवार यांनी बोलताना सांगितले.
मिठाई पॅकिंगसाठी जाड पिशव्यांचा वापर
सावित्रीबाई फुले महिला बचत गटच्या अध्यक्षा सुजाता निकाळजे म्हणाल्या की, बाजारपेठेतील गरज लक्षात घेवून गरजू महिलांकडून कागदी पिशव्या तयार करण्याचे काम सुरू करायचे आहे. यामुळे महिला बचत गटांना काम मिळेल. बचतगटांना काम मिळेल, त्यांना पैसे मिळतील. तसेच त्यांना स्वतःच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी मिळेल. मिठाई पॅकींगसाठी जाड कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. कॅरीबॅग मागु नये असे सुचना फलक दुकानात लावण्यात आले आहेत, असे मिठाई विक्रेत्याने सांगितले.