जळगाव : परीक्षेत पेपर कठीण गेल्यामुळे नैराश्यात आलेल्या जामनेर तालुक्यातील जळंद्री येथील अकरावीच्या विद्यार्थिनीने 25 रोजी उंदीर मारण्याचे औषध घेतले होेते. उपचार सुरु असताना गुरुवारी सायंकाळी तिचा जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. प्रियंका देविदास उबाळे ( वय 17) मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रियंका उबाळे अकरावी वाणिज्यमध्ये (कॉमर्स) शिक्षण घेत होती. 25 रोजी परीक्षेतील पेपर अवघड गेल्यामुळे तिने महाविद्यालयातच उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून घेतले. रस्त्याने येत असताना तिची प्रकृती अचानक खालावली. गावातील युवकांनी प्रियंका हिस ओळखल्यानंतर तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. नंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत बाधीत प्रियंका हिला पहूरच्या रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून मंगळवारी तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात अधिकच्या उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना गुरूवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. प्रियंका हिच्या पश्चात आई वडिल, बहिण, भाऊ असा परिवार आहे. प्रियंका सर्वात लहान होती. मोठी बहिण विवाहित आहे. तर भाऊ रूपेश पदवीच्या प्रथम वर्षाला जामनेरच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.