पेपर दिला गणिताचा आणि पास झाला जीवशास्त्रात

0

पाटणा । बिहार शिक्षण मंडळाचा 12 वीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकाल जाहीर होताच अनेक चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. या निकालामध्ये 64 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. यातच एक विद्यार्थ्याने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलाने 12 वीचा गणिताचा पेपर दिला होता. मात्र, त्याला जीवशास्त्रात पास करण्यात आले आहे. त्याच्या या दाव्याने सर्वांचीच झोप उडवली आहे.

निकालात केवळ हाच गोंधळ नाही आहे तर आर्ट्समध्ये टॉपर असलेल्या गणेश कुमार वरून देखील गोंधळ निर्माण झाला आहे. गणेश कुमार यानं संगीत विषयाची निवड केली होती. यात त्याला प्रॅक्टिकलमध्ये 70 पैकी 65 मार्क्स मिळाले. मात्र, त्याला एवढे मार्क्स बघून तो फेक टॉपर तर नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे निकालानंतर गणेश कुमार बेपत्ता आहे. काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्याला शोधून काढल्यावर त्याला संगीताचे कसलेच आकलन नसल्याचे स्पष्ट झाले. जेईई- एमआयएनएनएस टॉप केलेला विद्यार्थी 12 वी मध्ये नापास झाल्याची घटना ही समोर आली आहे. या विद्यार्थ्याचं नाव इब्राहिम असून तो जेईई- एमआयएनएनएस मध्ये टॉपर होता. त्याला 12 वी मध्ये चांगले मार्क्स मिळणार याची खात्री होती मात्र तो नापास झाला आहे. इब्राहिम भौतिक शास्त्र अणि रसायन शास्त्रात नापास झाल्याचा निकाल आहे, पण त्याला जेईई परीक्षेत याच विषयात चांगले गुण मिळाले आहे.