एरंडोल । तालुक्यात खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी मजुरांच्या टंचाईची समस्या शेतकर्यांसमोर उभी राहिली आहे. तालुक्यात सर्वात जास्त कपाशीची लागवड करण्यात येते मात्र यावर्षी पाण्याच्या समस्येमुळे कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे 20 ते 22 मे पर्यंत बागायती क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात येत असते. मात्र यावर्षी अद्यापपर्यंत अनेक भागात केवळ शेताची मशागत पूर्ण करून शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. तालुक्यात कपाशीच्या खालोखाल ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका यांसह कडधान्याची पेरणी केली जात असते.
जुन महिन्यात खरीपाची पेरणी पूर्ण होत असते. यावर्षी खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीचे कामे पूर्ण करण्यात शेतकरी व्यस्त झाले असून शेताची नांगरटी करणे, शेणखत टाकणे, बियाण्यांबाबत माहिती घेणे आदी कामांमध्ये शेतकरी व्यस्त झाले आहेत. लग्नसराई मुळे अनेक ठिकाणी मजुरांची टंचाई जाणवत असून शेतकरी स्वता: शेतीची कामे करीत आहेत. यावर्षी ठिंबक संचाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान पावसाला सुरु होणार असल्यामुळे घरांची दुरुस्ती करणे, धाब्यावर खारी टाकणे आदी कामे करण्यात नागरिक व्यस्त झाले आहेत. नगरपालिकेने देखील पावसाळ्यात गटारींमध्ये पाणी तुंबणार नाही त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.