पुणे : राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला असून, 72 टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. लागवडीखालील क्षेत्रात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून, त्याखालोखाल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यातील धरणांमध्ये 34.74 टक्के जलसाठा झाला असून, तो गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
राज्यात सरासरी 74 टक्के पाऊस
राज्यात 1 जून ते 19 जुलैअखेर 182.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या 73.90 टक्के एवढा असून, गेल्यावर्षी याच सुमारास तो सरासरीच्या 108.5 टक्के एवढा झाला होता. ठाणे, रायगड, पालघर, पुणे, गडचिरोली या पाच जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, वर्धा, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस; धुळे, जळगांव, अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांत 51 ते 75 टक्के पाऊस औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अकोला, जालना, यवतमाळ या नऊ जिल्ह्यांत 26 ते 50 टक्के पाऊस आणि सोलापूर जिल्ह्यात 0 ते 25 टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहितीही कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.
कोल्हापूर, पुणे विभागात भाताची पुनर्लागवड
राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र ऊस पीक वगळून 139.64 लाख हेक्टर असून, 14 जुलैअखेर 101.20 लाख हेक्टर क्षेत्रावर (72 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच कोकण, कोल्हापूर, पुणे विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू होती. यामध्ये कापसाची 35.53 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याखालोखाल तेलबिया (31.67 लाख हेक्टर) आणि तृणधान्याची (17.25 लाख हेक्टर) पेरणी झाली आहे. राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांतील पाणीसाठ्यात 34.74 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, गेल्यावर्षी याच सुमारास 31.90 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे : मराठवाडा – 18.84 टक्के (3.1), कोकण – 79.31 टक्के (67.21), नागपूर – 14.68 टक्के (30.49), अमरावती – 19.31 टक्के (27.20), नाशिक – 36.04 टक्के (30.02) आणि पुणे – 41.88 टक्के (39.93).
यंदा रासायनिक खतांच्या मागणीत मोठी वाढ
राज्यात रासायनिक खतांचा वार्षिक वापर सरासरी सुमारे 60 लाख टन असून, त्यापैकी खरीप हंगामात सरासरी 33 लाख टन तर रब्बी हंगामात 27 लाख टन वापर होतो. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 43 लाख टन खतांची मागणी असून, 39 लाख टन एवढ्या खतांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, केंद्र शासनाने राज्यासाठी युरिया खताचे एकूण 0.50 लाख मेट्रीक टन वाढीव राखीव आवंटन मंजूर केले आहे. खरीप-2016 मधील खत वापराच्या तुलनेत यावेळच्या मागणीचे प्रमाण 24 टक्क्यांनी जास्त आहे. खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील तीन वर्षाची सरासरी विक्री आणि बियाणे बदल दर यानुसार पिकनिहाय बियाण्याची गरज निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध असणार्या बियाण्याची माहिती घेऊन नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी 16.50 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, त्या तुलनेत 18.09 लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे. 75 टक्के पुरवठा झाला आहे, असेही कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.