पेव्हर मशीनला इर्टिगाची धडक

0

नऊ जण जखमी : चाळीसगावच्या खरजई नाक्यावरील घटना

चाळीसगाव – येथील भडगाव रोडवरील ओझर गावाजवळील मंडई पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पेव्हर मशीनला इर्टीगा चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ९ जण जखमी झाले. ही घटना काल शहरातील खरजई नाक्याजवळ घडली. जखमींवर चाळीसगाव येथे प्राथमिक उपचार करून त्यांच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविले.
भडगाव येथे गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून कार मधील प्रवाशी नाशिककडे जात होते. तेव्हा शहरातील खरजई नाक्यावरील उभ्या असलेल्या पेव्हर मशीनला कारने धडक दिली. कारमधील एअर बॅग उघडल्याने प्रवाश्यांना किरकोळ मार लागला. यात राजेंद्र धांडे, सुवर्णा धांडे रा. दाभाडी, स्वाती धामणे, रमाकांत धामणे, नुतन धामणे, सुनीता शिरूडे, वंदना शिरूडे (रा. मालेगाव) व विवेक येवले (रा. भडगाव) हे जखमी झाले. या जखमींवर तात्काळ भडगाव रोड स्थित कल्पतरु हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून नाशिक येथे हलविण्यात आले. मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश भोकरे, नीलेश कोतकर,अमोल पाखले, सचिन मोराणकर, अजय वाणी, जितेंद्र वाणी आदींनी मदतकार्य केले.

बेलगंगेजवळ रूग्णवाहिका उलटली
ओझर गावाजवळील झालेल्या अपघातातील जखमींना रूग्णवाहिकेद्वारे नाशिक येथे पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना बेलगंगेजवळ रूग्णवाहिका एमएच ०२ एक्सए ९१६१ हिला कट मारल्याने ती उलटली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. दुसरी रूग्णवाहिका लागलीच बोलावुन रूग्णांना नाशिक येथे रवाना करण्यात आले.

शिवाजी चौकातून मोटार सायकल लंपास
गुढे येथील रहिवासी शोएब शेख हे दि. १८ रोजी दुपारी दोनच्या शिवाजी चौकातील आनंद ऑप्टीकल येथे चष्मा बनविण्यासाठी आले होते. त्यांनी दुकानाबाहेर गाडी लावून चष्मा बनविण्याच्या दुकानात गेले होते. चष्मा बनवुन ते दुकानाच्या खाली उतरले असता त्यांनी मोटार सायकल ड्रीम युगा एमएच १५ डीडब्ल्यु ६०९२ ही त्यांना मिळुन आली नाही. त्यांनी सदर गाडीचा परिसरात शोध घेतला असता त्यांना ती गाडी कुठेच मिळुन न आल्याने त्यांनी चाळीसगाव शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदिप तहसीलदार हे करीत आहे.

तितुर नदीतील गावठी भट्टीवर छापा
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा शिवारात तितुर नदीपात्रात एक महिला गावठी दारू तयार करण्याची भट्टी तयार करून गावठी दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज रबडे, पोलीस नाईक राहुल पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण सपकाळे, तुकाराम चव्हाण यांनी त्याठिकाणी दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजता छापा मारून त्याठिकाणी गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर दोनशे लिटर उकळते रसायन, १५ लिटर मापाचे तीन पत्री ड्रम त्यात ४५ लिटर गुळमोह, नवसागर मिश्रित दारू गाळण्यासाठी असणारे २४५ लिटर कच्चे-पक्के रसायन व ५०० रुपये किमतीची दहा लिटर तयार गावठी दारू असा एकूण ६६२५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे त्यानंतर दारूचे रसायन व भट्टी जागीच नाश करून भट्टी चालक महिलेला पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल तुकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तालुक्यातील टाकळी प्रचा येथील ४८ वर्षीय महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.