पुणे । मंगळवार पेठेत महापालिकेच्या वतीने एसआरए प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यासाठी या प्रकल्पाच्या ठेकेदाराने येथील पेशवेकालीन पुरातन शिवमंदिराचे बांधकाम पाडल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पतितपावन संघटनेला कळवताच हे शिवमंदिर पूर्ववत उभे करून द्यावे, अशी मागणी करीत सोमवारी आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे आंदोलन
मंगळवार पेठ सिटी सर्व्हे क्र. 391, 392 येथे महापालिकेच्या वतीने एसआरए प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना संबंधित प्रकल्पाच्या ठेकेदाराने येथील हे मंदिर पाडल्याचे समोर आले. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पतितपावन संघटनेला कळवली होती. त्यानुसार शिवमंदिर पूर्ववत उभे करून द्यावे, अशी मागणी करीत शहरप्रमुख सीताराम खाडे यांच्या नेतृत्वाखाली पतितपावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सरचिटणीस मनोज पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर बांधून देण्याचे आश्वासन
संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीने मंदिराची पूर्ववत उभारणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पतितपावन संघटनेतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सीताराम खाडे यांनी संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द केले.