पिंपरी : महंमद पैगंबर जयंतीनिमित्त शुक्रवारी ( दि. 1) पिंपरी गावातून निघणार्या मिरवणुकीसाठी दुपारी दोननंतर या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
वाहतुक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील मिरवणुकीला जामा मशीद येथून सुरुवात होईल. नंतर ती मिलिंदनगर, पिंपरी रिव्हर रोडने भाटनगर, पिंपरी मेनबाजार, शगुन चौक, डिलक्स चौक, अशोक चौक, साई चौक, परत शगुन चौक, पिंपरी रेल्वे उड्डाणपूल, उजवीकडे वळून पुढे गोकुळ हॉटेल, पिंपरी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे.
मिरवणूक मार्गावर दुपारी दोन नंतर कोणतेही वाहन, हातगाडी लावू नये. लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच दुपारी दोन नंतर या मार्गावर गरजेनुसार मार्ग बंद किंवा थोडा वेळासाठी चालु करण्यात येईल. मिरवणूक पुढे सरकताच मागील सर्व मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत खुले कऱण्यात येतील. नागरिकांनी व वाहनचालकांनी मिरवणूक काळात या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा, परिसरात गर्दी न करता वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.