जळगाव। जिल्हा नियोजन समिती ही महत्वपूर्ण समिती आहे. जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी देण्यात येतो. जिल्हा वार्षिक आराखडा निश्चित करून शिक्षण, आरोग्य, बांधकाम, आदिवासी उपयोजना, पर्यटनासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणांना निधी उपलब्ध करून दिला जातो. मार्च महिन्यापासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते.
गेल्याचार महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा नियोजन समितीची निवडणूक 20 ऑगस्टपूर्वी घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिलेली आहे. मात्र आर्थिक अडचणी अभावी निवडणूक घेण्यास निवडणूक निर्णय अधिकार्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे अद्यापही हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य नगरपालिका सदस्य मतदार आहेत. त्याची प्रारूप यादी तयार करण्यात आलेली आहे. या यादीला अंतिम मान्यता देवून निवडणूक प्रक्रिया घेतली जाणार आहे. या निवडणुकीसाठी 25 लाख रुपयांची मागणी केलेली होती. परंतु त्यांनी निवडणूक घेण्यासाठी पैसा उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे पैसा उपलब्ध होईपर्यंत निवडणूक घेणार नसल्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घेतलेली आहे.