पैशांच्या कारणावरून एकास मारहाण

0

पिंपरी : भिशीच्या पैशांची वारंवार मागणी करूनही पैसे देत नसल्याने एकाला भिशीच्या कार्यालयात डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्याच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे 80 हजार रुपयांची रक्कम आपल्या खात्यात जमा केल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) सकाळी साडेअकराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आऊटगेटजवळ घडला. राजू शिंदे (वय 45, रा. खराळवाडी), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रामेश्वर बाळकृष्ण मोहाडीकर (वय 53, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कडाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करतात. मोहाडीकर यांनी शिंदे यांच्याकडे भिशी लावली होती. मोहाडीकर यांच्याकडून भिशीची काही रक्कम येणे असल्याने शिंदे याने त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. परंतु पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने शिंदे याने मोहाडीकर यांना शुक्रवारी महापालिकेच्या आऊटगेट जवळून गाडीत बसवून भिशीच्या कार्यालयात नेले. तेथे त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मोहाडीकर यांच्या बँकेच्या आरटीजीएस फॉर्मवर सही घेऊन त्यांच्या खात्यामधील 80 हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा करून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.