पैशांच्या वादातून मित्रांच्या मदतीने लांबविले चक्क ट्रॅक्टर

0

फुफनगरी येथील घटना : अवघ्या तीन दिवसात स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा छडा


जळगाव : पैशांच्या देवाण घेवाणीच्या जुन्या वादातून तरुणाने त्याच्या मित्रांच्या मदतीने फुफनगरी येथून ट्रालीसह ट्रॅक्टर लांबविल्याची घटना 4 रोजी समोर आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसातच या गुन्ह्याचा छडा लावला. व ट्रॅक्टर लांबविणार्‍या जितेंद्र उर्फ विशाल एकनाथ सपकाळे वय 20, आकाश ईच्छाराम सपकाळे वय 21 मयुर सोपान सपकाळे वय 21 (तिघे रा, कोळीवाडा, कानळदा) या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहे. संशयित तरुणांनी गुन्ह्याची कबूली दिली असून ज्याच्या सांगण्यावरुन चोरी केली त्या विनोद हुकूमचंद साळुंखे (वय 25 रा, फुफनगरी, ह.मु. शिरपूर) यालाही तालुका पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉलीसह ताब्यात घेतले आहे.

काय घडली होती घटना

फुफनगरी येथील लिलाधार रमेश सोनवणे यांनी त्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली नेहमीप्रमाणे गावातील खळ्यात लावले होते. सोनवणे खळ्यात गेले असता खळ्यातील ट्रॅक्टर, ट्रॉॅली गायब असल्याचे दिसून आले. 4 फेब्रुवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. लिलाधर सोनवणे यांचे गावातील विनोद साळुंखे यांच्यासह कानळदा येथील विशाल सपकाळे, मयुर सपकाळे व आकाश सपकाळे यांच्यासोबत पैशांचे जुने वाद असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.

चोरीनंतर इसाळे गावी नेले ट्रॅक्टर

ट्रॅक्टर लांबविणार्‍या संशयिताबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रोहम यांनी जितेंद्र पाटील यांच्यासह विजयसिंग पाटील, गफुर तडवी, राहूल पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक तयार नियुक्त करुन सुचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कानळदा, विदगाव तसेच डांभूर्णी अशा वेगवेगळ्या गावांमधून विशाल सपकाळे, आकाश व मयुर सपकाळे या तिघांना सुरुवातीला ताब्यात घेतले. ट्रॅक्टर लांबविल्यानंतर शिरपूर तालुक्यातील इसाळे गावी मोकळ्या जागेत उभे केल्याचेही त्यांनी सांगितले. या माहितीनुसार तालुका पोलिसांनी शनिवारी सकाळी इसाळे येथून ट्रॅक्टर, ट्रॉलीसह विनोद साळुंखे यालाही ताब्यात घेतले. आकाश व मयुर यांच्याविरोधात यापूर्वी पोलिसात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.