मुलासह अन्य एका आरोपीला अटक ; बहिणीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा
रावेर- एक हजार रुपये मागितल्यानंतर वयोवृद्ध आईने ते न दिल्याने जन्मदात्रीच्या डोक्यातच लाकडी फळी टाकून तिचा खून करून आरोपी पसार झाले मात्र पोलिस चौकशीत या गुन्ह्याचे बिंग उघडकीस आले. सख्ख्या मुलानेच हे कृत्य केल्याने त्याच्यासह साथीदारास अटक करण्यात आली आहे. पालच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात रावेर पोलिसांना यश आले असून आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
विजयादशमीच्या दिवशी खून करून आरोपी पसार
पाल येथील स्वातंत्र्यसैनिक भगवान भोई यांच्या पत्नी सुशीला पाल (ता.रावेर) येथे एकट्याच राहत होत्या. भुसावळात भोई नगरात राहणारा त्यांचा मुलगा संतोष सतत पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास धमकी द्यायचा. दरम्यान, विजयादशमीला संतोष त्याचा मित्र शेख अकबर शेख गुलाब (रा.भुसावळ) याला घेऊन पाल येथे आला होता. रात्री 8.30 वाजता त्याने सुशीलाबाईंकडे एक हजार रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाले. यानंतर संतोषने मित्र अकबर याला घराच्या दरवाजाजवळ उभे राहण्यास सांगून घरातील लाकडी फळीने आईच्या डोक्यात वार केले. यानंतर रक्तबंभाळ आईची हालचाल होत नसल्याने पाहून अकबरच्या मदतीने तिला पलंगावर टाकले. यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून दुचाकीने दोघे भुसावळकडे निघाले. दरम्यान, मंगळवारी सुशीलाबाईंची हत्या झाल्याचे समोर येताच मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. बुधवारी शवविच्छेदन सुरू असताना सुशीलाबाईंच्या दोन्ही मुली, जावयासोबत संतोषही तेथे उपस्थित होते. संशय आल्याने बहिणींनी त्याच्याकडे विचारणा करताच त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी मंगलाबाई चिंधू भोई (रा.पाडळसा) यांनी दोघांविरुद्ध तक्रार दिली.
बहिणीने दाखल केला भावाविरुद्ध खुनाचा गुन्हा
एक मुलगा आणि चार विवाहित मुली असलेल्या सुशीलाबाईंचे कामानिमित्त मुली किंवा नातेवाईकांकडे येणे-जाणे असायचे. दसर्यानिमित्त त्या बाहेरगावाहून पाल येथे राहत्या घरी आल्या होत्या. दसर्याच्या दिवशीच जावई चिंधू भोई यांनी त्यांची विचारपूस केली होती. तेव्हा सर्व व्यवस्थित असल्याचे सुशीलाबाईने जावयास सांगितले होते. मात्र, दसर्याच्या दुसर्या दिवसापासून त्यांचा फोन बंद येत होता. घराला कुलूप होते. मंगळवारी नातेवाईकांनी घरात पाहिले असता दुर्गंधी आली. यानंतर घटना उघडकीस आली.