नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेने सोमवारी जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता एटीएम मशीन्समधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारपासून एटीएममधून दिवसाकाठी दहा हजार रूपयांची रक्कम काढता येईल. यापूर्वी ही मर्यादा 4,500 इतकी होती. मात्र, एटीएममधून आठवड्याला 24 हजार रूपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय, बँकेच्या चालू खात्यातून रक्कम काढण्याच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार इतकी होती, ती आता एक लाख इतकी करण्यात आली. दरम्यान, एटीएममधून केले जाणारे मोफत व्यवहार निम्म्याने कमी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन आहे. सध्या एका एटीएम कार्डच्या मदतीने दर महिन्याला 8 ते 10 व्यवहार मोफत करता येतात. मात्र या मोफत व्यवहारांची संख्या फक्त तीनवर आणण्याचा सरकारचा विचार आहे.
1 जुलैपासून जीएसटी लागू होणार
दरम्यान, केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी देशात 1 जुलैपासून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू होणार असल्याचे सोमवारी जाहीर केले आहे.प्रस्तावित कराशी संबंधित सर्व प्रलंबित मुद्द्यांचा निपटारा केला जाईल आणि ही करव्यवस्था 1 एप्रिलपासून लागू केली जाईल, असा आशावाद केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 11 जानेवारी रोजी व्यक्त केला होता. मात्र जीएसटी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत एक एप्रिल ऐवजी आता एक जुलैला देशात जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. जीएसटी लागू करण्यासाठी जास्तीत जास्त मुदत 16 सप्टेंबर 2017 ही आहे. या व्यवस्थेत केंद्र आणि राज्य सरकारांचे बहुतांश कर समाविष्ट केले जातील. केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवाकर, तसेच राज्यांचे व्हॅट आणि विक्रीकर आदींचा त्यात समावेश आहे.