पैसे घेऊन मल्ल्यासारखा पळालो नाही!

0

डीएसकेंचे आरोप करणार्‍यांना प्रत्युत्तर

पुणे : सध्या आमच्याकडे तब्बल आठ हजार मुदत ठेवी आहेत. यापैकी 90 टक्के गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आहेत. लवकरच सर्व व्यवस्थित होईल. मी विजय मल्ल्याप्रमाणे गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन परदेशात पळून गेलेलो नाही. मात्र, मी एकाही गुंतवणूकदारांचे पैसे ठेवणार नाही. सर्वांना पैसे परत करेन, असे आश्वासन बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी दिले. ठेवीदारांचे पैसे थकवल्यामुळे अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन गुंतवणूकदारांना आश्वस्त केले. यावेळी डीएसके भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. पत्रकार परिषदेला त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह मुलगाही उपस्थित होता.

माझा कारभार पहिल्यापासून पारदर्शक
डीएसके समूहाविषयी प्रसारमाध्यमांवर आणि सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहेत. अशा नकारात्मक आरोपांना प्रत्युत्तर देण्याच्या फंदात मी सहसा पडत नाही. मात्र, यामुळे समूहाच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होऊ लागल्याने मी सगळ्यांना विश्वासात घेण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. मी आजपर्यंत कुणालाही फसवले नाही. माझा कारभार पहिल्यापासून पारदर्शक आहे. गेल्या काही दिवसांत अडचणी आल्यामुळे ठेवीदारांचे पैसे द्यायला आम्हाला उशीर झाला, ही बाब मान्य आहे. मात्र, ठेवीदारांना फसवणे आणि पैसे द्यायला उशीर होणे, या दोन भिन्न बाबी आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी भविष्यात माझ्यावर आरोप करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा, असेही डीएसके यांनी सूचवले.

नोटाबंदीने माझा घात केला
सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यामुळे घरांचे भाव निम्म्यावर आले. त्यामुळे जानेवारी 2017 पासून व्यवसायात काही अडथळे येत होते. तत्पूर्वी जानेवारी ते ऑक्टोबर 2016 पर्यंत आम्ही गुंतवणुकदारांचे 250 कोटी परत केले. सध्या आमच्याकडे तब्बल आठ हजार मुदत ठेवी आहेत. यापैकी 90 टक्के गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आहेत. लवकरच सर्व व्यवस्थित होईल आणि आम्ही सर्वांचे पैसे परत देऊ, असेही डीएसके यांनी सांगितले.

निगेटिव्ह बातम्यांमुळे अडचणीत आलो
माझ्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता नसल्याचा अफवा पसरत होत्या. आज माझे संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित आहे. मला माझ्या गुंतवणूकदारांना दिलासा द्यायचा आहे. आम्ही कोणाचाही पैसा बुडवणार नाही, आम्ही सर्वांचे पैसे परत देऊ. मीडियाने मला मोठे केले. वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिली मुलाखत दिली. मीडिया माझा विक पॉईंट आहे. मात्र याच मीडियात सध्या नकारात्मक बातम्या येत आहेत. आम्ही निगेटिव्ह बातम्यांमुळे अडचणीत आलो आहोत. पत्रकारांनी कृपया लिहिताना थोडे भान ठेवावे, कारण तुमच्या लिहिण्यामुळे मी अडचणीत येतो असे नाही, तर माझ्या अडचणीमुळे अनेकांची अडचण वाढते, मग त्यात गुंतवणूकदार, शेअर होल्डर्स वगैरे सर्व आले, असेही डीएसके म्हणाले. आजपर्यंत माझ्याविरोधात एकही तक्रार नव्हती, माझे आयुष्य धुतल्या तांदळासारखे आहे. सर्वांचे पैसे परत करु, असं डीएस कुलकर्णी म्हणाले. शिवाय मी कोणाची फसवणूक केली असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी स्वत:च्या सल्लागारासोबत यावे आणि मला हवा तो प्रश्न विचारावा, त्याबाबत मी स्पष्टीकरण देईन, असे डीएसके म्हणाले.

काय आहे प्रकरण
गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. 2014 पासून अनेकांनी घर बूक केले आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.

ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचे आश्वासन
इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचे आश्वासन दिले. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळाले. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणे डीएसकेंसाठी कठीण होत गेले. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेर्‍या मारु लागले.

इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे
मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली. डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.

मुंबईत सात कोटी रुपयांची फसवणूक
गेल्याच आठवड्यात विशेष न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. बांधकाम क्षेत्रात बडे प्रस्थ असलेले डी. एस. कुलकर्णी हे ठेवीदारांची फसवणूक केल्याने अडचणीत आले आहेत. याप्रकरणी सुमारे 351 ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. 12 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते. शेवटी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दीपक सखाराम ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला होता.