मुंबई – पैसे जमा करण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून एका त्रिकुटाने तरुणाची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिघांनी चार लाखांपैकी सव्वालाख रुपये घेऊन पलायन केले असून पळून गेलेल्या तिघांविरुद्ध एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना काल दुपारी साडेबारा ते एक वाजता झव्हेरी बाजार येथील टी. बी. झेडसमोरील आयसीआयसीआय बँकेत घडली. उशीरहमजा नासीर अन्सारी हा तरुण नागपाडा येथील मदनपुरा, मौलाना आझाद रोडवरील सुबेदार इमारतीमध्ये राहतो.
काल दुपारी साडेबारा वाजता तो आयसीआयसीआय बँकेत चार लाख रुपये जमा करण्यासाठी आला होता. कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे असतानाच तिथे तीन तरुण आले. या तिघांनी त्याला एैसा पैसा नही भरते असे सांगून त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्याच्याकडून चार लाख रुपये घेतले. त्यातील एक लाख अठ्ठावीस हजार रुपये काढून ते तिघेही तेथून पळून गेले होते. हा प्रकार नंतर उशीरहमजा अन्सारी याच्या लक्षात येताच त्याने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना त्याने घडलेला प्रकार सांगून तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीवरुन तिन्ही तरुणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. बँकेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात ते तिन्हीत तरुण स्पष्टपणे दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे तिन्ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.