पुणे । नोटाबंदीला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही शहरातील अनेक एटीएममध्ये पैशांचा खडखडाट आहे. याचाच निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील एटीएममध्ये पूजा घालून अनोखे आंदोलन केले.
देशातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, गुजरातसह महाराष्ट्र या राज्यांमधील बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला आहे. याबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवला असता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मागणीत अचानक वाढ झाल्याने ही स्थिती उद्भवल्याचे त्यांनी सांगितले. सध्या चलनात गरजेपेक्षा अधिक नोटा चलनात असून ही टंचाई तात्पुरती असल्याचे ते म्हणाले. दरम्यान चलन टंचाईचा निषेध करत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सदाशिव पेठेतील सिंडिकेट बँकेच्या एटीएमची पूजा करून आंदोलन केले.