तळेगाव । एका वृद्ध दाम्पत्याला इच्छामरण करणयाची वेळ आली आहे. कोणत्याही आजाराने त्रस्त होऊन नाही तर, त्यांना श्रावणबाळ योजनेतून मिळणारे पैसे बंद झाल्याने संसाराचा गाडा चालविणे आता या वृद्ध दाम्पत्याला कठीण जात आहे म्हणून त्यांनी इच्छामरणाची भावना व्यक्त केली आहे. हे वृद्ध दाम्पत्य संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील रहिवाशी आहेत. संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली असून त्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. संपतराव कुळधरण (73), सखुबाई कुळधरण (70) असे या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. वर्षभरापासून श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळणे बंद झाल्याने चरितार्थ चालविणे अवघड बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्य सेवा निवृत्ती पेन्शन बंद झाल्याचा अर्ज 20 सप्टेंबर 2016 रोजी संगमनेरच्या तहसीलदारांकडे करून पेन्शन पूर्ववत चालू करण्याची मागणी केली होती.
वर्षभरापासून उपासमार
या वृद्ध दाम्पत्याने बँकेत व तहसीलदार कार्यालयात वारंवार हेलपाटे मारले, उंबरठे झिजविले मात्र अधिकार्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वर्षभरापासून आमची उपासमार होत असून उपजिविका व चरितार्थ चालविणे अवघड बनले आहे. श्रावणबाळ योजनेचे पैसे सोडून आमच्याकडे चरितार्थासाठी दुसरे साधन नाही. वर्षभरापासून पेन्शन बंद असल्याने उपासमार होत आहे. त्यामुळे आम्हाला इच्छा मरणास परवानगी द्यावी, अन्यथा संगमनेर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही कुळधरण दांपत्याने दिला आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी 17 जुलै रोजी संगमनेरच्या तहसीलदारांसह प्रांताधिकारी व जिल्हाधिकार्यांना दिले.